पुन्हा एकदा ‘१९८९’ !
काश्मीरमध्ये रहाणाऱ्या काश्मिरी हिंदूंना ‘लष्कर-ए-इस्लाम’ नावाच्या जिहादी आतंकवादी संघटनेने ‘काश्मीर सोडा, अन्यथा मरायला सिद्ध व्हा’, अशी धमकी नुकतीच दिली. वर्ष १९८९ मध्येही आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदूंना अशाच प्रकारे धमकी दिली होती. तेव्हा ‘भाईचाऱ्यात’ मग्न असणाऱ्या हिंदूंना त्यांच्या ‘कथित भावां’पासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका रात्रीत काश्मीर सोडून पळून जावे लागले होते. जे गेले नाहीत, त्यांच्या सामूहिक हत्या करण्यात आल्या. असंख्य हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले. हिंदूंची श्रद्धास्थाने भ्रष्ट आणि नष्ट करण्यात आली. देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. एवढा मोठा संहार होऊनही आपला देश आणि संपूर्ण जग शांत राहिले.
सर्वपक्षीय राजकारणी तर ‘जणू काही झालेच नाही’, अशा आविर्भावात होते. कुणीही याची चौकशी करण्याची साधी मागणीसुद्धा केली नाही, ही वस्तूस्थिती आहे. या इतिहासाची आठवण करून देण्याचे कारण इतकेच की, ‘लष्कर-ए-इस्लाम’कडून आज वर्ष २०२२ मध्येही अगदी तशीच्या तशी धमकी दिली जाते आणि वर्ष १९८९ प्रमाणेच आजही सर्व जण शांतच आहेत; पण आता काळ पालटला आहे. तेव्हा काश्मिरी हिंदूंना कुणाचाही पाठिंबा नव्हता. आता समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांच्या मागे भक्कमपणे उभ्या आहेत.
खरे तर आज ३३ वर्षांनंतरही काश्मिरी हिंदूंना अशाच प्रकारची धमकी मिळते, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद आहे. खरे तर भारत अण्वस्त्रधारी देश आहे. तरीही मूठभर जिहादी आतंकवादी गेल्या ३ दशकांहून अधिक काळ भारतातील सर्वपक्षीय सरकारांना आव्हान देतात आणि कुठलेही सरकार त्यांचा मुळासह निःपात करून हिंदूंचे रक्षण करू शकत नाही, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. यावरून हिंदूंना तेथे रहाण्याची स्थिती अद्याप निर्माण झालेली नाही, हे स्पष्ट होते. काश्मीर हिंदूंसाठी सुरक्षित असल्याचे सर्व सरकारी दावे या धमकीने एका मिनिटात फोल ठरवले. हे चित्र पालटण्यासाठी आतंकवाद्यांचा समूळ नायनाट करणे आवश्यक आहे. त्यासाठी आतंकवाद्यांच्या धमक्या ऐकून घेणारे नव्हे, तर आतंकवाद्यांना ‘काश्मीर सोडा, अन्यथा मरायला सिद्ध व्हा’, अशी धमकी देणारे आणि त्याप्रमाणे आतंकवाद्यांचा नायनाट करणारे सरकार हवे !