समान नागरी कायदा नसलेला देश ‘सेक्युलर’ कसा ? – स्वामी गोविंददेव गिरी महाराज
नाशिक – सर्वांसाठी एक कायदा असणे हे नैसर्गिक आहे. जगातील कुठल्याही देशात असा भेदभाव नाही. समान नागरी कायदा नसणे, हे रानटीपणाचे लक्षण आहे. सर्वांसाठी एक कायदा असणे यालाच ‘सेक्युलर’ म्हणता येईल, अन्यथा त्या देशाला ‘सेक्युलर’ कसे म्हणता येईल ?, असा प्रश्न रामजन्मभूमी न्यासाचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी उपस्थित केला. स्वामी गोविंददेव गिरी महाराज हे १७ मेपासून नाशिक दौर्यावर आले आहेत. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी बोलतांना वरील विधान केले.
ज्ञानवापी येथे ऐतिहासिक पुरावे अनेक शतके आधीच मिळाले आहेत !
स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, ‘‘ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी चालू असलेले सर्वेक्षण आणि अन्वेषण काही नवीन नाही. या प्रकारचे ऐतिहासिक पुरावे अनेक शतके आधीच मिळाले आहेत. पुरातन काळातील नंदीचे तोंड मशिदीकडे असल्याने त्यासमोर शिवलिंग मिळणे आणि इतरही काही मूर्ती मिळणे स्वाभाविकच आहे. ‘३ मंदिरे आम्हाला देऊन टाका. चौथ्या कुठल्याही मंदिराचा वाद होणार नाही’, ही भूमिका विहिंपचे अशोक सिंघल यांनी त्या वेळी मांडली होती आणि ती योग्य होती. मुसलमान पक्षकार त्यांचे दावे करतीलच; पण वस्तूस्थिती काय आहे, हे पाहिले पाहिजे. मी विद्यार्थीदशेत ‘तेजोमहालय’ पुस्तक वाचले होते. आम्हा सर्वांना विश्वास आहे की, ताजमहालच्या ठिकाणी राजपुतांनी शिवमंदिर बांधले होते आणि त्याचे नाव ‘तेजोमहालय’ होते. केवळ शहाजहानने बांधलेली इमारत नव्हती, तर त्या ठिकाणी हिंदूंची काहीतरी मूळ वास्तू होती. या ठिकाणच्या बंद खोल्या उघड्या करून त्याचे ध्वनीचित्रीकरण करून घ्यावे म्हणजे प्रश्न मिटतील. सर्वांच्या सहमतीनेच सर्व व्हावे, असे वाटते आणि त्यासाठी मुसलमान समाज स्वतःहून पुढे आल्यास सलोख्याच्या वातावरणात प्रश्न मिटेल.’’
अयोध्येला जाण्यामागे राजकीय हेतूपेक्षा श्रद्धा हवी !
‘अयोध्येतील श्रीराम सर्वांचाच आहे. ज्याला वाटेल त्याने येऊन दर्शन घ्यावे. त्यावर कुणाचाही प्रतिबंध असू नये; मात्र अयोध्येला जाण्यामागे राजकीय हेतूपेक्षा श्रद्धा हवी’, असे त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी मत मांडले.
फेब्रुवारी २०२४ मध्ये रामललाची स्थापना होईल !
स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, ‘‘फेब्रुवारी २०२४ मध्ये गर्भगृहात रामललाची स्थापना करण्यात येणार असून तोपर्यंत पहिला मजला आणि गर्भगृह होईल. यामुळे लोकांच्या दर्शनाची व्यवस्था होईल आणि दुसरीकडे मंदिराचे बांधकामही चालू राहील.’’