राजीव गांधी यांचा मारेकरी पेरारिवलन् याच्या सुटकेचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश !
नवी देहली – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगार ए.जी. पेरारिवलन् याच्या सुटकेचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे ३१ वर्षांनंतर तो कारागृहाबाहेर येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने कलम १४२ च्या (विशेष अधिकाराच्या) आधारावर पेरारिवलन् याच्या सुटकेचा आदेश दिला आहे.
१९ वर्षांचा असतांना पेरारिवलन् याला ११ जून १९९१ मध्ये अटक करण्यात आली होती. २१ मे १९९१ या दिवशी राजीव गांधी यांच्या हत्येसाठी मानवी बाँबचा वापर करण्यात आला होता. त्यामध्ये वापरण्यात आलेल्या बॅटरीज पेरारिवलन्ने पुरवल्या होत्या. वर्ष १९९८ मध्ये ‘टाडा’ न्यायालयाने पेरारिवन्ला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती, तर वर्ष २०१४ मध्ये या शिक्षेत पालट करत सर्वोच्च न्यायालयाने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणी दया याचिका राष्ट्रपतींकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुटकेचा आदेश दिला आहे.