अवाजवी तिकीटदर आकारणार्या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार प्रविष्ट !
तक्रार प्रविष्ट करून घेण्यास पोलिसांची टाळाटाळ !
मुंबई, १८ मे (वार्ता.) – अवाजवी तिकीटदर आकारल्या प्रकरणी ‘मोहन टॅ्रव्हल्स (घाडगे पाटील)’ या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सच्या विरोधात वरळी येथील श्री. अभिषेक मुरुकटे यांनी १७ मे या दिवशी दादर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी फसवणूक करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी श्री. अभिषेक मुरुकटे यांनी केली आहे.
श्री. अभिषेक मुरुकटे यांनी १७ मे या दिवशी मुंबई ते कोल्हापूर या मार्गाचे ‘मोहन ट्रॅव्हल्स (घाडगे पाटील)’ या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सचे तिकीट काढले. त्यांची गाडी २१ मेच्या रात्री ८.५० वाजता दादर येथून सुटणार आहे. हे तिकीट त्यांनी ‘रेडबस’ या ‘ऑनलाईन अॅप’वरून काढले. यासाठी श्री. अभिषेक यांना १ सहस्र ९९५ रुपये द्यावे लागले. याची रितसर पावती श्री. अभिषेक यांच्याकडे आहे. हे तिकीट काढल्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गाड्यांच्या तुलनेत खासगी प्रवासी टॅ्रव्हल्सचे तिकीट भरमसाठ असल्याचे श्री. अभिषेक यांच्या लक्षात आले. शासनाच्या आदेशानुसार खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचे दर अधिकतम परिवहन विभागाच्या त्याच प्रकारच्या दीडपटीपर्यंत असायला हवेत, असा शासनाचा आदेश असल्याचे श्री. अभिषेक मुरुकटे यांच्या लक्षात आले. ‘मोहन ट्रॅव्हल्स (घाडगे पाटील)’ या खासगी प्रवासी गाडीचे तिकीट मात्र दीडपटीहून अधिक असल्याचे श्री. अभिषेक यांच्या निदर्शनास आले. यामध्ये आर्थिक फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच श्री. अभिषेक यांनी पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीमध्ये मोहन टॅ्रव्हल्स (घाडगे पाटील) या बसचे मालक, चालक, संचालक, तसेच तत्सम व्यक्ती यांनी एकत्रितरित्या फसवणूक केल्याचे नमूद करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी श्री. अभिषेक मुरुकटे यांनी केली आहे.
पोलिसांची टोलवाटोलवी !
पोलिसांनी प्रथम तक्रार न स्वीकारता श्री. अभिषेक मुरुकटे यांना ग्राहक मंचाकडे तक्रार करण्यास सांगितले. त्यानंतर तक्रारीवर ‘केवळ माहितीसाठी’ असे लिहिण्यास सांगितले. त्यावर श्री. अभिषेक मुरुकटे यांनी केवळ माहितीसाठी नसून कारवाई व्हावी, यासाठी तक्रार करत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रात्र झाली असल्यामुळे सकाळी तक्रार करण्यास येण्यास सांगितले. त्या वेळी श्री. अभिषेक यांनी ‘रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत तक्रार आली, तर घ्यायची नाही’, असे आहे का ? अशा प्रकारे सांगितल्यानंतर पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून घेतली. (गुन्हा रोखण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी तक्रार टाळण्याची पोलिसांची मानसिकता असेल, तर गुन्हे कसे रोखले जाणार ? पोलिसांनी अशी मानसिकता सुधारली, तरच जनतेला पोलिसांचा आधार वाटेल ! – संपादक)