‘जैश-ए-महंमद’चा आतंकवादी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या कह्यात !
रा.स्व.संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी केल्याचे प्रकरण
नागपूर – येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणार्या जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या रईस शेख (वय २८ वर्षे) याचा ताबा महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या नागपूर विभागाने घेतला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांकडून रईस शेख याचा ताबा ‘प्रोडक्शन वॉरंट’वर (आरोपीची चौकशी करण्यासाठी तो प्रत्यक्ष उपस्थित असण्यासाठीचा वॉरंट) घेण्यात आला आहे.
आतंकवादविरोधी पथकाकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या नागपुरातील हस्तकांविषयीचीही माहिती घेण्यात येत आहे. रईस याने जुलै २०२१ मध्ये डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसर, तसेच इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर त्याला काश्मीर पोलिसांनी अटक केली. रईसने पाकिस्तानमधील जैशच्या सूत्रधारांच्या आदेशावरून रेकी केल्याचे समोर आले. त्याला संघाच्या मुख्यालयाची रेकी करण्यास सांगण्यात आले होते, परंतु त्याला ते करता आले नाही. रेशीमबाग मैदानात आल्यावर त्याने भ्रमणभाषद्वारे स्मृती मंदिराचे चित्रीकरण केले.