भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणे आणि योग्य कृतींसाठी न्याय मिळवणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद
मंगळुरू (कर्नाटक) येथे चैतन्यदायी वातावरणात ३ दिवसांचे ‘अधिवक्ता साधना शिबिर’ पार पडले !
मंगळुरू (कर्नाटक) – आजकाल प्रत्येकच क्षेत्रात भ्रष्टाचार होत आहे, याविरुद्ध लढण्यासाठी आणि योग्य कृतींसाठी न्याय मिळवणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य आहे. अशा अनेक घटनांना सामोरे जाण्यासाठी अधिवक्त्यांनी साधना करणे, स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे अत्यावश्यक आहे. आज हिंदु विधीज्ञ परिषदेतील अनेक अधिवक्त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांच्या सेवेसह आध्यात्मिक साधना करून संतपदही प्राप्त केले आहे. यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनीच प्रयत्न करूया, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर केले. कर्नाटक राज्यातील विविध जिल्ह्यातील धर्म आणि राष्ट्र प्रेमी अधिवक्त्यांसाठी १३ ते १५ मे २०२२ या कालावधीत ‘आध्यात्मिक साधना शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या शिबिराचे उद्घाटन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा आणि अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी दीपप्रज्वलन करून केले. या शिबिराला राज्यातील विविध जिल्ह्यातून अनेक अधिवक्ता उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा (६४ टक्के आध्यात्मिक पातळी) यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प आणि हलाल अर्थव्यवस्था यांविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. सनातन संस्थेच्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या धर्मप्रचारक सौ. मंजुळा गौडा यांनी ‘प्रार्थनेचे महत्त्व आणि स्वभावदोष निर्मूलन कसे करावे ?’, यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. समितीचे राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनी समितीच्या व्यापक कार्याची माहिती सांगितली. या ३ दिवसांच्या शिबिरात अधिवक्त्यांना उत्साह आणि प्रेरणा मिळाली.
अष्टांगयोग साधना परिपूर्ण योगमार्गाची साधना असल्यामुळे सर्वांगाने प्रगती होते ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था
मनुष्य मागील अनेक जन्मांच्या कर्माची फळे आणि प्रारब्ध भोगण्यासाठी जन्म घेतो. मनुष्य जन्म हा पुष्कळ अमूल्य आहे. या जन्माचे सार्थक आपण साधना करून करू शकतो. यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेला सरळ, सुलभ आणि कलियुगातील सर्वांत सोपा साधना मार्ग म्हणजे गुरुकृपायोगानुसार साधना ! ही अष्टांगयोग साधना परिपूर्ण योगमार्गाची साधना असल्यामुळे सर्वांगाने प्रगती होते. या मार्गानुसार साधना करून सहस्रो साधक जन्म-मृत्यूच्या फेर्यातून मुक्त झाले आहेत आणि १०० हून अधिक साधक संतपदी विराजमान झाले आहेत.
अधिवक्त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण मनोगत
१. श्री. के. कृष्णस्वामी, वरिष्ठ अधिवक्ता, बेंगळुरू – या शिबिरातून आम्हाला साधनेविषयी प्रेरणा मिळाली आणि अनेक विषय शिकायला मिळाले. जे शिकायला मिळाले, ते कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करतो. समान विचाराच्या अधिवक्त्यांना संघटित करून समितीच्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्नही करीन.
२. अधिवक्ता (सुश्री) जयलक्ष्मी, कुणीगल – शिबिरातून समितीच्या व्यापक कार्याविषयी माहिती मिळाली. समितीच्या कार्यकर्त्यांचा प्रेमभाव, आदरातिथ्य, कार्यकर्त्यांच्या चेहर्यावरील प्रसन्नता हे सर्व पाहून पुष्कळ प्रेरणा मिळाली. शिबिरात शिकवलेले आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे महत्त्व लक्षात आले, त्यानुसार घरी जाऊन कृती करते. मुख्यतः स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया चांगली वाटली. माझे अनेक स्वभावदोष या शिबिराच्या माध्यमातून लक्षात आले. ते न्यून करण्यासाठी प्रयत्न करते.
३. अधिवक्ता सौ. इश्पिता, बेंगळुरू – शिबिरातून साधना करण्याची पुष्कळ प्रेरणा मिळाली. शिबिरात सांगितलेले प्रत्येक सूत्र माझ्यासाठी प्रेरणादायी होते. शिकायला मिळालेले प्रत्येक सूत्र कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करीन.
४. अधिवक्ता मल्लप्पा नायक, रायबाग, बेळगाव : शिबिरात मला प्रामुख्याने स्वयंशिस्त शिकायला मिळाली. प्रत्येक कृती शिस्तबद्ध आणि परिपूर्ण आहे, हे मला पुष्कळ आवडले. मला स्वतःमध्ये परिवर्तन आणणे आवश्यक आहे, याची जाणीव झाली. अन्य अधिवक्त्यांमध्ये धर्मजागृती करणे आवश्यक आहे. यासाठीही मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन.
५. अधिवक्ता पद्मनाभ होळ्ळा, बेंगळुरू (आध्यात्मिक स्तर ६३ टक्के) – या शिबिरामुळे मला परिशुद्ध व्हायचे आहे, असे वाटले. पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा साधना करणे पुष्कळ आवश्यक आहे. मी १०० हून अधिक संस्था, संघटनांना पाहिले आहे; पण आध्यात्मिक साधना केवळ सनातन संस्थेमध्येच सांगितली जाते. शरीर वाढण्यासाठी एक मर्यादा असते; पण अध्यात्मात आपण कितीही पुढे जाऊ शकतो. आपण ईश्वरापर्यंत जाऊ शकतो. मुख्यतः मला साधना अधिकाधिक करण्याची प्रेरणा मिळाली.
वैशिष्ट्यपूर्ण
शिबिराच्या शेवटच्या दिवशी सर्व शिबिरार्थी पुष्कळ उत्साहात होते. ते स्वतःहून ‘साधना कशी करायची ?’, हे विचारत होते. त्यांनी ‘आमच्यासाठी प्रत्येक ३ किंवा ६ मासांतून एकदा शिबिराचे आयोजन करा’, असे सांगितले.