हिमाचल प्रदेशातील मृकुलादेवी मंदिराची पहाणी करा !
|
सिमला (हिमाचल प्रदेश) – राज्यातील लाहौल जिल्ह्यात असलेल्या १ सहस्र वर्षे प्राचीन माता मृकुलादेवी मंदिराची पहाणी करण्याचा आदेश हिमाचल प्रदेशातील उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाला दिला आहे. वर्ष २०२० मध्ये या मंदिराच्या दु:स्थितीच्या संदर्भात जारी करण्यात आलेल्या एका अहवालाची न्यायालयाने स्वत:हून नोंद घेत याचिका प्रविष्ट करून घेतली होती. यासंदर्भात पुरातत्व विभागाने एक समिती नेमली असून ७ दिवसांत त्याचा अहवाल सादर करणार असल्याची माहिती न्यायालयाला याआधी दिली होती. त्यानंतर विभागाने एक अतिरिक्त मास मुदतवाढीची मागणी केली. यावर न्यायालयाने १५ दिवसांची मुदत वाढवून दिली असून एका मासात मंदिराचे संवर्धन करण्याचा आदेश दिला आहे.
माता मृकुलादेवीचे धार्मिक महत्त्व !
माता मृकुलादेवी ही कालीदेवीचे रूप असून हे मंदिर ११ व्या शतकात बांधण्यात आले. महाभारताच्या काळात पांडवांनी एका लाकडापासून हे मंदिर बांधले असल्याचेही सांगितले जाते. कालीदेवीने महिषासुराचा वध केल्यावर देवीने त्याच्या रक्ताने भरलेले पात्र या ठिकाणी ठेवले. आताही देवीच्या मुख्य मूर्तीच्या मागे हे पात्र ठेवल्याचे सांगण्यात येते; परंतु ते पाहिल्यास पहाणारा अंध होतो’, अशी भक्तांची धारणा आहे.
संपादकीय भूमिकापुरातत्व विभागाची अकार्यक्षमता दर्शवणारे हे उदाहरण ! ‘आता सरकारने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करायला हवी’, असेच हिंदु भाविकांना वाटते ! |