केवळ काशीच नव्हे, तर बळकावलेली ३६ सहस्र मंदिरे पुन्हा मिळवल्याविना हिंदू थांबणार नाहीत ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज
हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘भोजशाळेतील माता श्री वाग्देवी मंदिराच्या जागी कमाल मौला मशीद कशी ?’
मुंबई – भारतातील सहस्रो मंदिरे तोडून इस्लामी आक्रमकांनी त्या ठिकाणी मशिदी उभारल्या. त्या प्रत्येक मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी हिंदूंच्या अनेक पिढ्यांनी प्राणांचे बलीदान दिले आहे; मात्र मंदिरावरील अधिकार कधीच सोडलेला नाही. आम्हीही त्याच हिंदूंचे वंशज आहोत. हिंदूंकडून जे जे हिसकावून घेण्यात आले आहे, ते ते तुम्हाला परत द्यावे लागणार आहे.
हा आता नवीन हिंदुस्थान आहे. हिंदूंची धार्मिक स्थळे पुन्हा मिळवण्याचा संकल्प काही शतकापूर्वी झाला होता. तो प्रत्यक्षात आणण्याची कृती आता होत आहे. केवळ अयोध्येतील राममंदिर, काशीतील श्री विश्वनाथ मंदिर, मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरच नव्हे, तर कुतूबमिनारसह देशभरात अशा ३६ सहस्र मंदिरांची सूची आहे की, जी बळकावलेली आहेत. ही मंदिरे पुन्हा मिळाल्याविना हिंदू थांबणार नाहीत, असे स्पष्ट प्रतिपादन ‘सुदर्शन न्यूज’चे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘भोजशाळेतील माता श्री वाग्देवी मंदिराच्या जागी कमाल मौला मशीद कशी ?’, या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
इंग्लंडमधील वाग्देवीची मूर्ती परत आणण्यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणायला हवा ! – देवेंद्र पांडे, राष्ट्रीय महासचिव, अखिल भारत हिंदु महासभा
मध्यप्रदेशातील धार येथे वर्ष १०३४ मध्ये राजा भोज यांनी स्थापन केलेले माता वाग्देवीचे (श्री सरस्वतीदेवीचे) सर्वांत प्राचीन मंदिर होते. त्यावर वर्ष १३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला. नंतर वर्ष १४०१ मध्ये दिलावर खानने आक्रमण केले आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मशीद उभारली. त्यानंतर मेहमूदने आणखी एक मशीद उभारली. ब्रिटीश राजवटीत वर्ष १८७५ मध्ये मंदिराच्या ठिकाणी उत्खनन करतांना सापडलेली माता वाग्देवीची मूर्ती इंग्लंडमधील संग्रहालयात नेण्यात आली. आजही भारताचे ज्ञान तथा बुद्धी इंग्लंडमध्ये बंदिस्त आहे. भारत सरकार त्याविषयी पाठपुरावा करून ती मूर्ती परत आणू शकते. यासाठी हिंदूंनी दबाव निर्माण केला पाहिजे.
हे पहा –
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की..⭕ भोजशाला में मां वाग्देवी मंदिर के स्थान पर कमाल मौला मस्जिद कैसे ? https://t.co/gPMvmocbwj
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) May 14, 2022
__________________________
‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा त्वरित हटवायला हवा ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था
मोगलांनी अनेक मंदिरे पाडली. त्यावर हिंदूंनी लढा देऊन ती पुन्हा उभी केली; मात्र मोगल आक्रमकांनी ती पुन्हा पाडली. आताही आपण मंदिरे उभी करत आहोत; पण मंदिरांच्या रक्षणासाठी आपण काय व्यवस्था उभी करणार आहोत ? याचा विचार हिंदूंनी करायला हवा. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा होता कामा नयेत. तसेच हिंदूंशी विश्वासघात करून काँग्रेस सरकारने सिद्ध केलेला ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९१’ (या कायद्यानुसार वर्ष १९४७ पासून १९९१ पर्यंत धार्मिक स्थळांविषयी न्यायालयांत जे खटले चालू असतील, ते सरळसरळ बंद करण्यात येणार आहेत, तसेच जी पूजास्थळे ज्या धार्मिक परिस्थितीत होती, ती तशीच रहातील.) हा मंदिराच्या उभारणीमध्ये अडथळा ठरत आहे. हा कायदा त्वरित हटवला पाहिजे. जिथे जिथे मंदिर तोडून मशीद बांधली, तेथे पुन्हा मंदिर उभारले गेले पाहिजे.