वय आणि आजार यांवरून आरोपीला उदारता दाखवता येणार नाही ! – मुंबई विशेष न्यायालय
नातीचे लैंगिक शोषण करणाऱ्या वृद्धाला ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !
मुंबई – वय आणि आजार यांवरून आरोपीला उदारता दाखवता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबईतील विशेष न्यायालयाने एका बलात्काराच्या प्रकरणात नोंदवले आहे. वर्ष २०१४ मधील स्वत:च्या सावत्र नातीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका वृद्धाला शिक्षा सुनावतांना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवले. १५ मे या दिवशी बलात्कारी वृद्धाला न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली.
बलात्कार हा समाजातील एक गंभीर गुन्हा आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार म्हणजे तिचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करणे होय. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या प्रकरणांत आरोपीला योग्य शिक्षा देऊन अशा प्रकरणांचा निपटारा करणे आवश्यक आहे, असे या वेळी न्यायालयाने म्हटले.