योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या संस्कारित सूर्यप्रतिमेतून पुष्कळ प्रमाणात तेजतत्त्व (चैतन्य) प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

कल्याण येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची वैशाख कृष्ण द्वितीया (१७ मे २०२२) या दिवशी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त हे लिखाण प्रसिद्ध करत आहोत.

योगतज्ञ दादाजी वैशंपायन

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महामृत्यूयोग टळावेत, सनातनच्या साधकांवर होणारी अनिष्ट शक्तींची आक्रमणे दूर व्हावीत, सनातनचे सर्व संकटांपासून रक्षण व्हावे आणि ईश्वरी राज्याच्या (हिंदु राष्ट्राच्या) स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यांसाठी अनेक अनुष्ठाने, जप-तप इत्यादी केलेच; पण वेळोवेळी विविध आध्यात्मिक उपायही करण्यास सांगितले. त्यांपैकी एक म्हणजे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात संस्कारित धातूने बनवलेली सूर्यप्रतिमा ३ ठिकाणी लावण्यासाठी दिली.

योगतज्ञ दादाजी यांनी आध्यात्मिक उपायांसाठी दिलेल्या सूर्यप्रतिमेतून प्रक्षेपित होणाऱ्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी तिन्ही सूर्यप्रतिमांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.


रामनाथी आश्रमाच्या सभागृहातील सूर्यप्रतिमा
सनातनच्या कलामंदिरातील सूर्यप्रतिमा
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील सूर्यप्रतिमा

१. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या सूर्यप्रतिमांतून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

योगतज्ञ दादाजी यांनी दिलेल्या तिन्ही सूर्यप्रतिमांमध्ये काही प्रमाणात नकारात्मक स्पंदने आणि पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने आढळून आली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

सौ. मधुरा कर्वे

१ अ. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी दिलेल्या संस्कारित सूर्यप्रतिमांतून पुष्कळ प्रमाणात तेजतत्त्व (चैतन्य) प्रक्षेपित होणे : योगतज्ञ प.पू. दादाजी यांनी दिलेल्या संस्कारित सूर्यप्रतिमा एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे कार्य करतात. ज्याप्रमाणे लोहचुंबकाकडे लोहकण खेचले जातात, त्याप्रमाणे वातावरणातील अनिष्ट शक्ती या सूर्यप्रतिमांकडे खेचल्या जाऊन त्यांतील तेजाने नष्ट होतात. अशाप्रकारे योगतज्ञ दादाजी यांनी दिलेल्या सूर्यप्रतिमांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांनी निर्मिलेले आश्रम यांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते. ही प्रक्रिया घडतांना एकप्रकारे सूक्ष्मयुद्धच होत असते. या सूक्ष्मयुद्धामुळे अनिष्ट शक्तींद्वारे प्रक्षेपित होणाऱ्या त्रासदायक स्पंदनांचा प्रभाव सूर्यप्रतिमांवर होतो; पण थोड्या वेळाने सूर्यप्रतिमांतील तेजाने तो नाहीसा होतो. तिन्ही सूर्यप्रतिमांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या निरीक्षणांतून सूर्यप्रतिमांमध्ये काही प्रमाणात नकारात्मक स्पंदने आढळून येण्यामागे हेच कारण आहे. सूर्यप्रतिमांवर तात्कालिक होणाऱ्या प्रभावातून या सूक्ष्मयुद्धाची तीव्रता लक्षात येते. सूर्यप्रतिमांतून तेजतत्त्वाची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक स्पंदने आढळून आली. त्या त्या ठिकाणी लावलेल्या सूर्यप्रतिमांतून आवश्यकतेनुसार त्या त्या प्रमाणात तेजतत्त्व प्रक्षेपित होते.

थोडक्यात सूर्यप्रतिमांच्या उपायांतून योगतज्ञ दादाजी यांचा अध्यात्मातील अधिकार लक्षात येतो. योगतज्ञ दादाजी यांनी २०.५.२०१९ या दिवशी नाशिक येथे देहत्याग केला. आता स्थूलदेहाने जरी ते आपल्यात नसले, तरी त्यांचे निर्गुण रूप (चैतन्यमय सूक्ष्म अस्तित्व) परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांनी निर्मिलेले आश्रम अन् सर्व साधक यांच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत आहे. परमकृपाळू योगतज्ञ दादाजी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.१०.२०२१)

ई-मेल : mav.research2014@gmail.com

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.