युक्रेनला ‘नाटो’ सैनिकी साहाय्य पुरवणार !

‘नाटो’चे प्रमुख जेन्स स्टोल्टेनबर्ग

कीव (युक्रेन) – ‘नाटो’ या आंतरराष्ट्रीय सैनिकी संघटनेने युक्रेनला सैनिकी साहाय्य पुरवणार असल्याचे घोषित केले आहे. युक्रेनी सैन्य रशियाशी शौर्याने लढत असल्याने ते युद्ध जिंकू शकते, असा विश्वास ‘नाटो’चे प्रमुख जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी व्यक्त केला. जर्मनीच्या बर्लिनमध्ये ‘नाटो’च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत जर्मनीनेही युक्रेनला साहाय्य करण्याची घोषणा केली.

दुसरीकडे फिनलँडने ‘नाटो’चा सदस्य बनण्यासाठी अर्ज केला आहे. फिनलँडच्या पाठोपाठ स्वीडननेही ‘नाटो’चा सदस्य बनण्यासाठी अर्ज केला आहे. ‘नाटो’तील तुर्कस्थानने मात्र फिनलँड आणि स्वीडन यांच्या सदस्यत्वाला विरोध दर्शवला असून ते कुर्दिश आतंकवाद्यांना साहाय्य करत असल्याचा आरोप केला आहे. स्टोल्टेनबर्ग यांनी मात्र दोन्ही देशांना ‘नाटो’मध्ये सहभागी होण्यापासून हा आरोप रोखू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

आम्ही हे निमूटपणे सहन करणार नाही ! – रशिया

मॉस्को (रशिया) – रशियाने मात्र फिनलँड आणि स्वीडन यांच्या या निर्णयांचा प्रखर विरोध केला असून ‘त्यांनी कल्पनाविश्वात राहू नये की, ‘आम्ही हे निमूटपणे सहन करू.’ दोन्ही देशांची ही घोडचूक असून त्याचे दूरगामी परिणाम होतील’, अशी चेतावणी दिली आहे. नाटोचा भाग झाल्यावरही दोन्ही देशांची शक्ती वाढणार नाही, असा दावाही रशियाचे उपविदेशमंत्री सर्गे रॅबकॉव यांनी केला आहे.