कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेले ‘एस्.एस्.आर्.एफ्’चे फोंडा (गोवा) येथील श्री. प्रसाद चेऊलकर (वय ५३ वर्षे) !
वैशाख कृष्ण द्वितीया (१७.५.२०२२) या दिवशी फोंडा (गोवा) येथील श्री. प्रसाद चेऊलकर यांचा ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
श्री. प्रसाद चेऊलकर यांना ५३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. बालपणापासून अनेक संकटांना सामोरे जावे लागणे आणि महाविद्यालयात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट होऊन त्यांच्यावर श्रद्धा बसणे
‘श्री. प्रसाद यांची आई शिक्षिका आणि वडील एका खासगी आस्थापनात नोकरी करत होते. प्रसाद सर्व भावंडांत लहान आणि आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा आहेत. वर्ष १९९० च्या सुमारास ते महाविद्यालयात असतांना त्यांच्या लिंगदेहाचे बहिर्गमन होत असल्याची (सूक्ष्मदेह स्थूलदेहाच्या बाहेर येण्याची) अनुभूती येत असे. याच कालावधीत त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी प्रथम भेट झाली. त्यानंतर काही मासांतच त्यांची परात्पर गुरुदेवांवर पूर्ण श्रद्धा बसली. त्यांना पूर्णवेळ साधना करायची होती; मात्र घरातील ‘कर्ता पुरुष’ या नात्याने त्यांच्यावर आई-वडिलांचे दायित्व होते. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ साधना करता आली नाही. त्यांनी लहानपणापासून ते वर्ष २००० मध्ये विदेशात जाईपर्यंत अत्यंत कष्टात दिवस काढले. त्यांना बालपणापासून अनेक संकटांना सामोरे जावे लागले. ‘परात्पर गुरुदेव माझ्या जीवनात आले. त्यांनी सर्व संकटांतून मला बाहेर काढले अन् आनंदी आयुष्य दिले’, अशी त्यांची श्रद्धा आहे.
२. व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा
प्रसाद यांनी घरातील सर्व महत्त्वाची, तसेच अधिकोषाशी संबंधित कागदपत्रे व्यवस्थितपणे लावून ठेवली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसाद आश्रमात रहायला गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत मला अधिकोषाशी संबंधित एक काम करायचे होते. या पूर्वी मी असे काम केले नसल्याने मला त्याचा ताण आला. अधिकोषात पोचल्यावर मी कोणताही विचार न करता तेथील यंत्रात धनादेश जमा केला. धनादेश जमा करतांना ‘बचत खात्याचा क्रमांक लागेल’, हे माझ्या लक्षात आले नाही. त्यामुळे मी घाबरले. नंतर ‘माझ्याकडे असलेल्या पाकिटावर आवश्यक ती सर्व माहिती लिहिली आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळे पुढील प्रक्रिया कोणताही अडथळा न येता सहजतेने पूर्ण झाली. या प्रसंगातून प्रसाद यांचे ‘व्यापक विचार करण्याची दृष्टी आणि शिस्तप्रियता’, हे गुण माझ्या लक्षात आले.
३. समंजस
प्रसाद यांनी सर्वच निर्णयांत मला संपूर्ण पाठिंबा दिला. आमच्या विवाहाला ४ वर्षे होऊनही आम्हाला मूल होत नव्हते. आमच्या शेजाऱ्यांनी ‘मूल होत नाही, तर तुम्ही मूल दत्तक घेऊ शकता’, असे आम्हाला सुचवले. याचा मला अधिकच ताण आला आणि निराशा आली. या कठीण काळातही प्रसाद खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. ते मला म्हणाले, ‘‘आवश्यकता असल्यास आपण वैद्यकीय तपासणी करून घेऊ; पण प्रथम मी तपासणी करून घेतो आणि नंतर आवश्यक वाटले, तर तुझी तपासणी करून घेऊया.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले; कारण मूल होत नसल्यास त्यासाठी बायकोला दोष देणारे नवरे मी पाहिले आहेत.
४. कौटुंबिक दायित्व निभावणे
४ अ. कुटुंबाचे दायित्व निभावण्यासाठी स्वसुखाचा त्याग करणे : वर्ष १९९७ ते १९९९ या कालावधीत प्रसाद यांनी एक लहानसा व्यवसाय चालू केला; मात्र त्यात हानी झाल्याने आम्हाला पुष्कळ आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. वर्ष १९९९ मध्ये मला दिवस गेले. त्यातच आर्थिक अडचणींमुळे ‘या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा ?’, या विचाराने आम्हाला पुष्कळ ताण आला होता. आम्ही ज्या आस्थापनातून धनरूपात ऋण घेतले होते, ते ही अडचण सामोपचाराने सोडवायला सिद्ध झाले. त्यांनी आम्हाला थोडे थोडे पैसे परत करायला सांगितले. प्रसाद यांनी आर्थिक ऋण फेडण्यासाठी विदेशात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. आमच्या पहिल्या मुलाच्या (समृद्धच्या) जन्मानंतर ३ मासांनी प्रसाद सौदी अरेबियाला गेले. प्रसाद यांच्यासाठी २ मासांच्या लहान बाळाला सोडून विदेशात जाणे पुष्कळ कठीण होते; पण ‘आम्हाला सुखात जगता यावे’, यासाठी त्यांनी सर्व स्वीकारले. ऋण फेडण्यासाठी विदेशात राहून नोकरी केल्यामुळे प्रसाद यांना समृद्धचे बालपण अनुभवता आले नाही.
४ आ. बाळाला सांभाळण्यासाठी पत्नीला साहाय्य करणे : आमच्या दुसऱ्या मुलाचा जन्म दुबई येथे झाला. तेथे आमच्या साहाय्याला कुणीही नव्हते. त्यामुळे बाळाची काळजी घेणे मला कठीण जात होते. या कालावधीतही प्रसाद यांनी मला पुष्कळ साहाय्य केले. ‘मला झोप मिळावी’, यासाठी ते रात्री बाळाला सांभाळत असत.
४ इ. मुलांना प्रेम देणे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करणे : प्रसाद मुलांची पुष्कळ काळजी घेतात आणि त्यांना आवश्यक ते सर्व देण्याचा प्रयत्न करतात. आमची दोन्ही मुले दुबईतील एका नामवंत शाळेत शिकली आहेत. त्यांच्या शाळेत घोडेस्वारी शिकण्याची सुविधा होती. त्याचे प्रशिक्षण मूल्यही पुष्कळ होते. असे असूनही प्रसाद यांनी मुलांना ते प्रशिक्षण घेऊ दिले. आमची दोन्ही मुले उत्तम घोडेस्वारी करतात. प्रसाद यांचे लहानपण कष्टात गेल्याने त्यांच्या पुष्कळ इच्छा अपूर्ण राहिल्या. त्यामुळे ‘मुलांना त्रास होऊ नये’, याची ते काळजी घेतात. ते शिस्तप्रियही आहेत. ‘देवाने आपल्याला जे दिले आहे, त्याविषयी आपण कृतज्ञ असायला हवे’, याची जाणीव ते मुलांना करून देतात.
४ ई. प्रसाद यांनी त्यांच्या आई-वडिलांची सेवा केली आणि त्यांना आवश्यक ते सर्व उपलब्ध करून दिले.
५. प्रेमभाव
प्रसाद यांना प्राण्यांविषयी पुष्कळ प्रेम आहे आणि प्राणीही त्यांच्याकडे आकर्षित होतात. ते दुबईत असतांना प्रतिदिन घोड्यांना सफरचंद आणि गाजरे खायला देत असत. प्रसाद अत्यंत मृदू स्वभावाचे असून गरजू लोकांना साहाय्य करायला सदैव तत्पर असतात. प्रसाद यांच्या कामाचे स्वरूप बांधकामांची पहाणी करणे, असे होते. दुबई येथे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पुष्कळ उन्हाळा असतो आणि तपमान ४५ ते ५० डिग्री सेल्सिअस इतके वाढते. त्या वेळी प्रसाद कडक उन्हात काम करणाऱ्या कामगारांसाठी शीतपेये, ताक, पाणी आणि काही वेळा जेवणही घेऊन जात असत.
६. सेवेची तळमळ
ते प्रत्येक सेवा झोकून देऊन आणि परिपूर्ण करतात. आम्ही दुबईत रहात असतांना त्यांना कामासाठी अबुधाबीला जावे लागे. त्यासाठी त्यांना प्रतिदिन जाता-येता प्रत्येकी अडीच ते ३ घंटे प्रवास करावा लागे. या अत्यंत दगदगीच्या दिनक्रमातही ते झोकून देऊन सेवा करत असत. प्रवास करून घरी परतल्यावर ते विनाविलंब सेवा पूर्ण करत असत.
७. मुलाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठिंबा देणे
समृद्धने पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर प्रसाद यांनी त्याच्या शिक्षणाचा विचार न करता त्याला तत्काळ अनुमती दिली. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘मला पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा होती; मात्र ‘व्यवहार आणि कौटुंबिक दायित्व’, यांमुळे मला ते जमले नाही. मी तुला थांबवणार नाही. तू धनाची चिंता करू नकोस. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आपले व्यवस्थित होईल. तू तुझ्या साधनेवर लक्ष केंद्रित कर.’’
८. तत्त्वनिष्ठ
आश्रमात रहात असतांना आमच्या लहान मुलाकडून काही चुका झाल्या. त्या वेळी प्रसाद यांनी त्याला पाठीशी न घालता तत्त्वनिष्ठ राहून त्याच्या चुकांची कठोर शब्दांत जाणीव करून दिली.
९. भगवान शंकराला प्रार्थना करून धूम्रपान न करण्याची शपथ घेणे आणि त्यानंतर आजतागायत धूम्रपान न करणे
पूर्वी प्रसाद यांना धूम्रपान करण्याचे व्यसन होते. ते दिवसभरात ४० – ५० सिगारेट ओढत आणि निराशा आल्यावर हे प्रमाण अधिक वाढत असे. वर्ष २००० मध्ये सौदी अरेबियाला गेल्यावर एके दिवशी त्यांनी ध्रूमपान सोडायचे ठरवले आणि भगवान शंकराला प्रार्थना करून ‘मी यापुढे धूम्रपान करणार नाही’, अशी शपथ घेतली. त्या दिवसापासून आजतागायत त्यांनी धूम्रपान केलेले नाही. ‘भगवान शंकराच्या कृपेनेच धूम्रपान सोडू शकलो’, अशी त्यांची दृढ श्रद्धा आहे.
१०. पत्नीला साधनेत साहाय्य करणे
अ. मला प्रसाद यांचा साधनेत पुष्कळ आधार वाटतो. काही वेळा मला निराशा येते. तेव्हा ते माझ्याशी बराच वेळ बोलतात. ते मला ‘श्रीकृष्णाशी अनुसंधान वाढवून या स्थितीतून बाहेर कसे पडायचे ?’, याविषयी सकारात्मक दृष्टीकोन देतात.
आ. काही वेळा मला उत्तरदायी साधकांनी सुचवलेले साधनेविषयीचे दृष्टीकोन स्वीकारणे कठीण जाते. अशा वेळी प्रसाद मला त्यांचे आध्यात्मिक विश्लेषण करून समजावून सांगतात.
इ. गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे असलेल्या दळणवळण बंदीमुळे आम्ही आश्रमात जाऊ शकलो नाही. दळणवळण बंदी शिथिल झाल्यावर आम्हाला ‘दोघांपैकी कोणीतरी एक आश्रमात रहायला येऊ शकता’, असे सांगण्यात आले. त्या वेळी प्रसाद यांनी मला आश्रमात जाण्यासाठी प्राधान्य दिले. मी आश्रमात गेल्यावर ‘प्रसाद यांना घर सांभाळणे आणि स्वयंपाक करणे जमेल का ?’, या विचाराने मला चिंता वाटत होती; पण त्यांनी मला निश्चिंत केले. त्यामुळे मला ४ मास आश्रमात रहाता आले आणि या कालावधीत त्यांनी विनातक्रार घर सांभाळले.
११. श्रद्धा
अ. वर्ष १९९५ मध्ये आमचा विवाह झाला आणि प्रसाद यांनी माझा परात्पर गुरु डॉक्टरांशी परिचय करून दिला. प्रसाद यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर अतूट श्रद्धा आहे. ते सातत्याने देवाच्या अनुसंधानात असतात. ‘जीवनातील बरे-वाईट प्रसंग हे प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार घडतात. ‘साधना, नामजप आणि परात्पर गुरुदेवांप्रती श्रद्धा’ या बळावर प्रारब्धावर मात करता येऊ शकते’, अशी त्यांची श्रद्धा आहे.
आ. ‘आमचा मुलगा समृद्ध वणीदेवीचा प्रसाद आहे’, अशी त्यांची श्रद्धा आहे. समृद्धच्या जन्मापूर्वी आम्ही वणीदेवीच्या दर्शनाला गेलो होतो. त्या वेळी मंदिरात प्रसाद यांना देवी ‘मी माझे कासव तुझ्याकडे पाठवत आहे’, असे सांगत असल्याचे ऐकू आले. त्यानंतर काही मासांतच मला दिवस गेले आणि समृद्धचा जन्म झाला.
इ. प्रसाद यांना कार्यालयातील कामानिमित्त दुबईत पुष्कळ प्रवास करावा लागत असे. ते नोकरी करत असलेल्या आस्थापनाचे मुख्य कार्यालय अबुधाबी येथे होते. प्रसाद यांच्याकडे संपूर्ण गल्फ विभागाच्या कार्याचे प्रमुख दायित्व होते. गुरुकृपेने प्रसाद यांनी गोवा येथे सदनिका घेण्याचे ठरवले. वर्ष २०१६ मध्ये मी आणि मुले गोवा येथे रहायला आलो. वर्ष २०१९ मध्ये प्रसाद यांनी नोकरी सोडली. ‘नोकरी सोडल्यावर कसे होईल ?’, असा कोणताही विकल्प मनात न आणता त्यांनी दुबई सोडून गोवा येथे परतण्याचा निर्णय घेतला. त्यांची ‘देवाने आजपर्यंत दिले आहे आणि यापुढेही तोच देणार आहे अन् आपली काळजी घेणार आहे’, अशी श्रद्धा आहे.
‘देवाच्या कृपेने मला प्रसाद यांच्यासारखे प्रेमळ, आधार देणारे आणि काळजी घेणारे पती मिळाले, तसेच मुलांना एक उत्तम पिता लाभले’, याबद्दल मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करते. गुरुदेवांच्या कृपेनेच मला प्रसाद यांच्याकडून शिकता आले आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये लिहून देता आली. ‘प्रसाद यांची आध्यात्मिक प्रगती जलद होवो’, अशी मी गुरुदेवांच्या पावन चरणी आर्त प्रार्थना करते.’
– सौ. योगिता प्रसाद चेऊलकर (पत्नी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.११.२०२१)