संभाजीनगर येथे मनसेची ‘पाणी संघर्ष यात्रा’ चालू, कार्यकर्त्यांच्या हाती रिकामे हंडे !
संभाजीनगर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील पाणी समस्येवरून १४ मेपासून शहरात मोठी ‘संघर्ष यात्रा’ चालू केली आहे. मनसेचे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर आणि सतनामसिंग गुलाटी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला शहरातील टीव्ही सेंटर परिसरातून प्रारंभ झाला आहे. या यात्रेत मनसेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात घोषणा दिल्या, तसेच अत्यंत विलंबाने होत असलेल्या पाणी समस्येवर महापालिका आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यावर ताशेरे ओढले. शहरातील ५५ प्रभागांतून मनसेचे कार्यकर्ते फिरणार असून लोकांना पाणी समस्येवर बोलते करणार आहेत. नागरिकांच्या पाण्याविषयीच्या समस्या पत्रांवर लिहून घेतल्या जाणार आहेत. जवळपास २५ सहस्र पत्रे मनसेचे कार्यकर्ते लिहून घेणार आहेत. त्यानंतर ही पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली जाणार आहेत.