पुणे शहर भाजपचे कोषाध्यक्ष विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण !
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर सामाजिक माध्यमांमध्ये (फेसबूक) वादग्रस्त कविता प्रसिद्ध केल्याविषयी भाजप पुणे शहराचे कोषाध्यक्ष आणि अधिवक्ता विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून १४ मे या दिवशी मारहाण करण्यात आली आहे. आंबेकर यांच्या विरोधात २ दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली होती. शरद पवार यांच्यावर अवमानकारक पोस्ट केल्याने ही मारहाण करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.
या मारहाणीविषयी आंबेकर म्हणाले, ‘मी ‘फेसबूक’वर केलेल्या कवितेमध्ये कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा उल्लेख नाही; परंतु कविता काही लोकांना खटकली आहे. त्या कवितेविषयी मी जाहीर माफी मागितली होती. तरीही आप्पा जाधव हे २०-२५ जणांना घेऊन कार्यालयामध्ये आले. तेव्हा मला ‘तुम्हाला पुण्यात रहायचे असेल तर आमचे नेते आणि पक्ष यांविषयी काहीही बोलायचे नाही. तुम्हाला योग्य ती जागा दाखवू. माजला आहात. माफी मागितली म्हणून उपकार केलेत का ?’, असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली. यामागे राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांचा हात असल्याचा आरोपही केला आहे.