केतकी चितळे यांच्या विरोधात असभ्य भाषेत टीका करून संस्कारहीन असल्याचे दाखवू नका ! – तृप्ती देसाई
अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवार यांच्यावर केलेल्या कवितेचे प्रकरण
पुणे – आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. केतकीच्या पोस्टमध्ये शरद पवारांचा उल्लेख कुठेही सापडत नाही, केवळ पवार असा उल्लेख आल्याचे तिने म्हटले आहे. केतकीच्या पोस्टवर आक्षेप असणाऱ्यांनी तिच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार करावी; मात्र तिच्या विरोधात असभ्य भाषेत टीका करून करून स्वत: संस्कारहीन असल्याचे दाखवू नका, असा टोला ‘भूमाता ब्रिग्रेड’च्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी ‘ट्रोलर’ला लगावला आहे. शरद पवार यांच्यावर कवितेच्या माध्यमातून आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी तर केतकीला चोप देण्याचीही भाषा केली आहे, तर काहींनी आक्षेपार्ह शब्दांत तिच्यावर टीका केली. यावरून तृप्ती देसाईंनी ‘ट्रोलर्सं’वर टीका केली आहे.