सोलापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !
|
सोलापूर, १५ मे (वार्ता.) – ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीमध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज आणि झाशीची राणी यांचा मानवी देखावा साकारण्यात आला होता. हिंदुत्वनिष्ठ संघटना, विविध संप्रदाय, धर्मप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिंडीत योग वेदांत सेवा समिती, क्षत्रिय समाजाच्या ‘एस्.एस्.के.’ प्रतिष्ठानच्या युवती, संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे मृदंग पथक यांसह सहस्रो सहभागी हिंदूंनी सोलापुरात हिंदु राष्ट्राचा हुंकार दिला. या फेरीसाठी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, पू. (कु.) दीपाली मतकर आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांची वंदनीय उपस्थिती होती.
हिंदू एकता दिंडीला जाजू भवन, बाळीवेस येथे श्री. गणेश आणि सौ. वर्षा देवरकोंडा या हिंदुत्वनिष्ठ दांपत्याच्या हस्ते धर्मध्वजपूजनाने प्रारंभ झाला. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या पालखीचे पूजन धर्मप्रेमी दांपत्य श्री. कृष्णहरी आणि सौ. रेखा क्यातम यांनी केला. श्री तुळजाभवानीदेवीच्या पालखीचे पूजन धर्मप्रेमी दांपत्य श्री. श्रीधर आणि सौ. रागिणी पवार यांनी केले, तर श्री विठ्ठलाच्या पालखीचे पूजन श्री. किशोर आणि सौ. वनिता राजुळे या दांपत्याने केले. यानंतर दिंडीला प्रारंभ झाला. श्री छत्रपती शिवाजी स्मारक येथे सांगता झाली.