भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून पुण्यनगरीत संचारले हिंदू नवचैतन्य !
पुणे येथील दिंडीत ५ सहस्र धर्मप्रेमींची उपस्थिती
पुणे, १५ मे (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने भव्य ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. १५ मे या दिवशी पुण्यातील भिकारदास मारुति मंदिरापासून सायंकाळी ५.३० वाजता चालू झालेल्या दिंडीची स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक (डेक्कन) येथे सांगता झाली.
या वेळी सनातन संस्थेच्या संतद्वयी पू. (श्रीमती) निर्मला दाते, पू. (सौ.) संगीता पाटील यांसह श्री. चैतन्य तागडे आणि प्रा. विठ्ठल जाधव उपस्थित होते. प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंच’चे (केडगाव) संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर आणि सौ. अंजली नीलेश लोणकर यांनी धर्मध्वजाचे पूजन केले.
भगवे ध्वज, दुमदुमणाऱ्या घोषणा अन् दिंडीमध्ये सहभागी झालेल्यांच्या मनातील गुरूंविषयीचा अपार कृतज्ञताभाव यांमुळे वातावरण हिंदु नवचैतन्याने भारित झाल्याचे उपस्थितांनी अनुभवले.