लोकायुक्त कायद्यासाठी राज्यात पुन्हा मोठ्या जनआंदोलनाची आवश्यकता ! – अण्णा हजारे
मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनीही लोकायुक्त कायदा करण्याचे आश्वासन दिले; मात्र अडीच वर्षे उलटूनही त्यावर काहीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे लोकायुक्त कायद्यासाठी राज्यात पुन्हा मोठे जनआंदोलन करण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. ‘एकतर कायदा करा, अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा’, अशी चेतावणीही या वेळी अण्णा हजारे यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘लोकायुक्त कायद्याच्या अनुषंगाने ७ बैठका पार पडल्या होत्या. महाविकास आघाडी सरकार येऊन २ वर्षे उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर बोलण्यास सिद्ध नाहीत. नेमके काय झाले ? हे कळायला मार्ग नाही. यासाठी आंदोलन करायचे झाल्यास राज्यातील ३५ जिल्ह्यांत आमची समिती सिद्ध झाली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची २ राज्यांत सत्ता आली; परंतु तेथे लोकायुक्त कायदा सिद्ध करण्यात आला नाही, याचे दु:ख वाटते.’’