इन्क्विझिशनमुळे गोव्याच्या संस्कृतीचा झालेला नाश
हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…
गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी एक डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. १४ मे या दिवशी आपण ‘गोव्यातील कुप्रसिद्ध इन्क्विझिशन (धर्मसमीक्षण सभा) आणि कॅथॉलिकांमधील जातीभेद’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.
१५. पाश्चात्त्य पोशाखाची हास्यास्पद नक्कल
भारतीय असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार करून पाश्चात्त्य रिवाजांची नक्कल करणे, हे सुसंस्कृत आणि चांगला ख्रिस्ती बनण्यास आवश्यक आहे, ही भावना रुजवण्यात पोर्तुगीज असहिष्णुता सफल झाली. सालाझारच्या हुकूमशाहीत हिंदु अधिकाऱ्यांना युरोपियन पद्धतीचा पेहराव करणे (कायद्याने नसले तरी) भाग आहे. काही कचेऱ्यांमध्ये कॉलर आणि टाय नसतांना शर्ट वापरण्यास मनाई आहे. अगदी दोन युरोपियन दंडाधिकाऱ्यांनी तीन शतकांपूर्वीचा कायदा उकरून काढला. त्यानुसार ‘प्रत्येक हिंदु किंवा मुसलमानाने कोर्टात येतांना टोपी किंवा फेटा न वापरता, उघड्या डोक्याने यावे’, असा आदेश काढला होता. असल्या सक्तीच्या पाश्चात्तीकरणामुळे, आरोग्याचे आणि सुखसोयीचे साधे प्राथमिक नियम सोडून अवघड सवयी अनुसरण्यास गोवेकर सिद्ध झाले. या विचित्र आणि खुशामती आज्ञापालनाचा ठळक दाखला म्हणजे कॅथॉलिक पाद्रीचा पेहराव. रणरणत्या उन्हात आणि असह्य उकाड्यातसुद्धा तो काळा, वुलन कॅसोक (लोकरीचा सैल झगा) घालून, घामाने ओलाचिंब होऊन वुलन नेकपीस (लोकरीचा गळ्याभोवती बांधण्याचा रुमाल) आणि चामड्याचे बूट घालून फिरत असतो. या विचित्र अनुकरणाची शर्थ, म्हणजे फॅशनच्या बाबतीत अव्वल असावे म्हणून कॅसोकवर ते जाड ओव्हरकोट, मखमली कॉलर आणि कफस् वापरतात. बाहेर जातांना त्यांनी पांढरा सुती झगा वापरला तर चालेल, अशी पोर्तुगीज पॅट्रिआर्कने शेवटी शेवटी अनुमती दिली होती.
सक्तीने किंवा शिष्टपणाचा भाग म्हणून पाश्चात्त्य सवयी आत्मसात केल्याने त्याचे हास्यास्पद परिणाम दिसून येतात. विशेषतः अल्प उत्पन्न असणाऱ्यांना सतत पालटणाऱ्या युरोपियन पेहरावाच्या तऱ्हा परवडणाऱ्या नसतात. त्याकरता बराच वरचा आर्थिक दर्जा असावा लागतो. तरीपण इतके हास्यास्पद परिणाम होत असूनसुद्धा आपले काही देशबांधव दुराग्रहाने पाश्चात्त्यांप्रमाणे कपडे करतात आणि त्यांच्यासारखे रहातात. तसे करण्याची त्यांच्यावर कुणी सक्ती करत नाही. तरीसुद्धा जबरदस्त व्यक्तीमत्त्व असणाऱ्या लोकांप्रमाणे, पाश्चात्त्य संस्कृतीतून हवे तितकेच घ्यावे, नको ते सोडून द्यावे, असेही ते लोक करत नाहीत. कोणतीही पाश्चात्त्य गोष्ट ते सरसकट स्वीकारतात. (पृष्ठ क्र. ४१)
१६. गोव्याची सांस्कृतिक दिवाळखोरी
गोव्याचा विचार करतांना, तो केवळ संस्कृतीचा ऱ्हास नव्हता, तर ती पूर्णतः सांस्कृतिक दिवाळखोरी होती, असेच म्हणावे लागेल. पोर्तुगिजांनी आमच्या राष्ट्रीय संस्कृतीच्या प्रगतीत बाधा तर आणलीच; पण तिच्या जागी उल्लेखनीय अशी नवी संस्कृती आणण्यासही ते लायक नव्हते, हेच सिद्ध केले. बौद्धिक प्रगतीच्या प्रत्येक शाखेत त्यांचे मागासलेपण दयनीय अवस्थेत असल्याने इथल्या संस्कृतीचा पायाच नष्ट केला आणि बौद्धिक क्षमता नक्कल अन् विडंबन यांच्या खालच्या पातळीवर आणली. (पृष्ठ क्र. ४३)
(लेखातील दिलेले पृष्ठ क्रमांक ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास’ या पुस्तकातील आहेत. इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)