नाशिक येथे ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून धर्माभिमान्यांकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी नमन !
नाशिक, १५ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नाशिक येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले. या वेळी सर्व धर्माभिमान्यांनी दिंडीत सहभागी होऊन एकप्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी नमन केले. श्री मोदकेश्वर मंदिर येथे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक श्री. जयंत भातांब्रेकर यांच्या हस्ते धर्मध्वजपूजनाने आणि महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढून दिंडीला प्रारंभ झाला.
याप्रसंगी सनातन संस्थेचे संत पू. महेंद्र क्षत्रिय, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, हिंदु एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राम सिंग बावरी, टाकळी मारुति मंदिराचे विश्वस्त श्री. भानुदास शौचे यांचीही उपस्थिती होती. श्री मोदकेश्वर गणपति मंदिराच्या ठिकाणाहून निघालेली दिंडी, रथचक्र चौक, कलानगर, चार्वाक चौक मार्गे पुन्हा श्री मोदकेश्वर गणपति मंदिराच्या ठिकाणी आल्यावर तिची सांगता झाली.