राज्यात शिष्यवृत्तीचे ६६ सहस्र अर्ज प्रलंबित
शिष्यवृत्ती न मिळाल्यास महाविद्यालयांवर होणार कारवाई !
नाशिक – समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या ‘भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजने’च्या अंतर्गत वर्ष २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी ‘महाडीबीटी पोर्टल’वर राज्यात ६६ सहस्र, तर नाशिक विभागातील ९ सहस्र विद्यार्थ्यांचे अर्ज विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्या स्तरावर अद्यापही प्रलंबित आहेत. महाविद्यालयांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज वेळेत सादर न केल्यास महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल, असे संकेत समाजकल्याण विभागाने १४ मे या दिवशी दिले आहेत.
१. नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर या ५ जिल्ह्यांतील अनुमाने ९ सहस्र ११७ अर्ज हे विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्या स्तरावर आज अखेर प्रलंबित आहेत.
२. त्यापैकी २ सहस्र ८३८ अर्ज हे विद्यार्थी यांनी, तर ६ सहस्र २७८ अर्ज हे महाविद्यालयांनी समाजकल्याण विभागाकडे वर्ग केलेले नाहीत. त्यामुळे भविष्यात हे अर्ज प्रलंबित राहिल्यास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मुकावे लागणार आहे.
३. समाजकल्याण विभागाने याविषयी सक्त सूचना निर्गमित केल्या असून ‘विद्यार्थी आणि महाविद्यालये यांनी अर्ज सादर न केल्यास त्याचे सर्वस्वी दायित्व हे विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालय यांचे असेल’, असे नमूद केले आहे.
४. याविषयी महाविद्यालयाकडून कार्यवाही करण्याच्या संदर्भात समाजकल्याण विभागाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. विभागातील एकूण प्रलंबित अर्जापैकी ३ सहस्र ७०० अर्ज हे नाशिक जिल्ह्यातील असून त्यात ९३९ अर्ज हे विद्यार्थी, तर २ सहस्र ७६२ अर्ज हे महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत, तसेच ३ सहस्र १०० अर्ज हे नगर जिल्ह्यातील आहेत. त्यात ५७९ विद्यार्थी, तर २ सहस्र १८३ महाविद्यालयांकडे प्रलंबित आहेत.