‘आय.एम्.ए.’ने रुग्णांची लूट थांबवावी !
कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करतांना संसर्ग होऊन जीव गमावणारे आधुनिक वैद्य आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी ५० लाख रुपयांचे ‘कोरोना कवच विमा संरक्षण’ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (‘आय.एम्.ए.’च्या) नोंदींनुसार ‘कोरोनामुळे महाराष्ट्रात ९९ खासगी आधुनिक वैद्य दगावले आहेत. त्यांच्या कुटुंबियांनी वैद्यकीय संचालकांद्वारे साहाय्याचे प्रस्ताव पाठवले होते. त्यातील केवळ २७ आधुनिक वैद्यांच्याच वारसांना साहाय्य मिळाले. २१ आधुनिक वैद्य सरकारी, तर ६ आधुनिक वैद्य खासगी आहेत. खासगी रुग्णालयांतील अन्य आधुनिक वैद्यांचे प्रस्ताव मान्य झालेले नाहीत. रुग्णांवर उपचार करतांनाच कोरोनामुळे दगावलेल्या खासगी आधुनिक वैद्यांनाही विमा संरक्षण मिळावे, यासाठी ‘आय.एम्.ए.’ने सरकारी पातळीवर पाठपुरावा केला. किंबहुना ‘आय.एम्.ए.’मुळेच विमा संरक्षणात खासगी आधुनिक वैद्यांच्या सेवेचा समावेश झाला.
कोरोनाच्या काळात सेवा करतांना दगावलेल्या प्रत्येक वैद्याला साहाय्य मिळाले पाहिजे, यामध्ये दुमत नाही. ज्या पोटतिडकीने ‘आय.एम्.ए.’ दगावलेल्या खासगी आधुनिक वैद्यांच्या साहाय्यासाठी मागणी करते, त्याचप्रमाणे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील खासगी रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची लूट थांबवण्यासाठीही तिच्याकडून प्रयत्न होणे अपेक्षित आहे. मुंबई, ठाणे, संभाजीनगर, नाशिक, पुणे अशा अनेक शहरांतील खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या काळात आणि त्याच्या पूर्वीही उपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून लाखो रुपये उकळले, हे दुर्दैवी आणि संतापजनक होते. या वेळी आय.एम्.ए. कुठे होती ? तिने रुग्णालयांवर कठोर कारवाई का केली नाही ? असे प्रश्न जनतेच्या मनात येतात. सर्व अधिकार हातात असतांना प्रयत्न न करणे, हे गंभीर आहे.
खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर चाप बसावा, यासाठी राज्य सरकारने कोविडकाळात उपचारांचे दर निश्चित केले आणि सर्व रुग्णालयांना सरकारी आदेशाचे पालन बंधनकारक केले; मात्र असे असूनही काही रुग्णालयांनी रुग्णांकडून लाखो रुपये वसूल केले. अशा तक्रारी केल्यानंतरही सरकारने त्यांच्यावर अंकुश लावायला हवा होता, तसेच ‘आय.एम्.ए.’ने लुबाडणूक झालेल्या रुग्णांना पैसे मिळवून देणे आवश्यक होते; परंतु असे काही दिसून आले नाही. त्यामुळे ‘आय.एम्.ए.’ने रुग्णांचाही विचार करून त्यांची लुबाडणूक थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
– श्री. सचिन कौलकर, मुंबई.