महर्षींनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना तमिळनाडू येथील कोळ्ळीमलई पर्वतावर जाऊन ३ दिवस रहाण्यास सांगण्यामागचे कारण आणि त्यांना तेथे आलेली अनुभूती
१. महर्षि वसिष्ठ यांनी ३ दिवस कोळ्ळीमलई या पर्वतावर जाऊन रहाण्यास सांगणे
११.१.२०२१ या दिवशी झालेल्या नाडीवाचनात पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षि वसिष्ठ यांनी सांगितले, ‘पुढचे ३ दिवस तुम्हाला कोळ्ळीमलई पर्वतावर जाऊन रहायचे आहे; कारण तो सिद्धांनी तप केलेला पर्वत आहे आणि तेथे अनेक दैवी वनस्पती आहेत. त्यामुळे तेथे तुमचे रक्षण होणार आहे.’
२. महर्षींची अनुभवलेली प्रीती !
२ अ. १२ ते १४.१.२०२१ या ३ दिवसांत अनिष्ट शक्तींकडून होणाऱ्या आक्रमणापासून रक्षण होण्यासाठी महर्षींनी कोळ्ळीमलई पर्वतावर रहाण्यास सांगणे : आम्ही चेन्नईहून ८ घंटे प्रवास करून १२.१.२०२१ या दिवशी कोळ्ळीमलई पर्वतावर आलो आणि तेथे राहिलो. याचे कारण सांगतांना महर्षि म्हणाले, ‘१४.१.२०२१ च्या संक्रांतीपर्यंतचे हे ३ दिवस पाताळातील मोठ्या वाईट शक्तींकडून सनातनच्या ३ गुरूंवर मृत्यूसंकटासारखे आक्रमण होणार आहे. हे आक्रमण करणीच्या माध्यमातून असेल ! वाईट शक्ती ही शक्ती भूमीवर फेकणार आहेत. त्यामुळे तुम्हाला आम्ही हे ३ दिवस पर्वतावर रहायला सांगितले आहे.’
महर्षींचा केवढा हा विचार आणि केवढे हे त्यांचे प्रेम !
२ आ. ‘कोळ्ळीमलई पर्वतावर असलेल्या धुक्याच्या दाट थरामुळेच तुमचे रक्षण होणार असून ‘एका गुरूंचे रक्षण झाल्यावर तिन्ही गुरूंचे रक्षण होणार आहे’, असे महर्षि वसिष्ठ यांनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सांगणे : येथे आल्यानंतर आम्ही कुठेच देवदर्शनाला बाहेर पडू शकलो नाही; कारण येथे पुष्कळ पाऊस होता. येथे सर्वत्र पुष्कळ धुके आणि थंडीही होती. धुके इतके दाट होते की, आम्हाला समोरचे काहीच दिसत नव्हते. जसे काही आम्ही ढगातच बसलो होतो ! यावर महर्षि म्हणाले, ‘तुम्हाला आम्ही ढगांच्या वज्रकवचात ठेवले आहे, जेणेकरून मोठ्या वाईट शक्तींची शक्ती तुमच्या शरिराला स्पर्श करू शकणार नाही. तुम्ही तीनही गुरु एकच आहात. एका गुरूंचे रक्षण झाले की, आपोआप तीनही गुरूंचे रक्षण होणारच आहे.’
महर्षि, केवढे हे आपले वात्सल्य !
३. योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे सामर्थ्य !
३ अ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर वाईट शक्तींनी आक्रमण केल्यामुळे योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी रक्षणासाठी दिलेली रुद्राक्ष आणि स्फटिक यांची माळ तुटणे : मोठ्या वाईट शक्तींच्या आक्रमणाची प्रचीती मला कोळ्ळीमलई पर्वतावर गेलेल्या रात्रीच आली. मी रात्री झोपतांना नेहमी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी मला रक्षणासाठी दिलेली स्फटिक आणि रुद्राक्ष यांची माळ गळ्यात घालून प.पू. दादाजींचे स्मरण करून मगच झोपते. मी ती माळ गळ्यात घालत असतांना ‘कुणीतरी माझ्या मानेवर जोरात आघात केला’, असे मला जाणवले; परंतु ते आक्रमण माळेने स्वतःवर घेतल्याने माळ खट्कन तुटली.
यावरून योगतज्ञ दादाजींचे सामर्थ्य लक्षात येते. आता ते देहाने नाहीत; परंतु त्यांच्या आशीर्वादाने अजूनही साधकांचे रक्षण होत आहे. त्यांनी दिलेल्या माळेने माझे रक्षण केले.
४. कृतज्ञता
सनातनच्या कार्याला साहाय्य करणारे संत आणि महर्षि यांच्या प्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, कोळ्ळीमलई, तमिळनाडू. (१४.१.२०२१)