योगतज्ञ दादाजी वैशंपायन  यांचे मौलिक विचार !

कल्याण येथील थोर संत योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांची वैशाख पौर्णिमा (१६ मे २०२२) या दिवशी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचे मौलिक विचार जाणून घेऊया.

१. सकारात्मकतेतील शक्ती !

घडणाऱ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले की, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपले हितच आहे, याची जाणीव होते. नेहमी सकारात्मक बोलणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. नैराश्यपूर्ण विचारांची व्यक्ती समाजातील लोकांना नकोशी वाटते.

२. स्नेही सदाचारी असावा !

धनवान स्नेही दुराचारी असेल, तर तो कधीही तुमचा विश्वासघात करू शकतो; पण तुमचा स्नेही सदाचारी असेल, तर तो कितीही निर्धन असला, तरी नित्य तुम्हाला साथच देतो.

३. खरा आनंद !

‘आनंद हा कोणताही प्रसंग, वस्तू अथवा व्यक्ती यांच्याशी निगडित नसावा. ज्या गोष्टीमुळे दुःख होते वा होईल, असा कोणताही आनंद नसावा. ‘आपला आनंद आपल्यात मिळावा’, हा विचार प्रत्येकाने सांभाळून ठेवावा, म्हणजे कोणत्याही अवस्थेत शांती ढळणार नाही. ‘तुझे आहे तुजपाशी’ या संतवाणीप्रमाणे ज्याचा त्याने शोध घेत जावा. मनाची स्थिती केवळ स्वतःशीच निगडित असावी. अन्य कुठेही संपर्क नसावा. हे प्रगत होऊ पहाणाऱ्या साधकांना परत परत सांगू इच्छितो.’

४. मनाला साधना करण्याचे वळण लावा !

‘ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ।’, म्हणजे ‘मी यथोचित असेच सांगत आहे; सत्य तेच सांगत आहे.’

५. स्पष्टीकरण !

सत्य पालटू शकते, उदा. ‘देवदत्त तरुण आहे’, हे वाक्य आता सत्य असले, तरी देवदत्त वृद्ध झाल्यावर हे वाक्य असत्य ठरते; परंतु ऋत कधीही पालटत नाही, उदा. सूर्य पूर्व दिशेला उगवतो. ऋत म्हणजे न पालटणारे नैसर्गिक सत्य.

म्हणजे सत्य आणि नित्य जे असेल, त्याची उपासना करण्याचे वळण मनाला लावावे, म्हणजे साधकांची उन्नती वेगाने होते.

६. खरा हितचिंतक !

‘अहो रूपम् अहो ध्वनिः ।’ म्हणजे ‘(गाढवाने उंटाला म्हणावे) वा ! काय रूप आहे आणि (उंटाने गाढवाला म्हणावे) वा ! काय आवाज आहे’, असे म्हणणारा कधीही मित्र नसतो. तुम्हाला तुमच्यातील दोष सांगणाराच तुमचा खरा मित्र आणि खरा हितचिंतक असतो.

७. बाह्यरूपापेक्षा आत्म्याचे रूप महत्त्वाचे !

नुसते बाह्यरूपच देखणे असून काय उपयोग ? आत्माही तेवढाच देखणा हवा ! दिव्याची काच घासून पुसून ठेवली; पण त्यात ज्योतच नसेल, तर त्याचा काय उपयोग ?

८. परमेश्वरावरील श्रद्धा !

परमेश्वरावरील श्रद्धा म्हणते, ‘हे कार्य देवच करू शकतो.’ त्यापेक्षा अधिक प्रमाणातील श्रद्धा म्हणते, ‘देव हे करीलच !’; पण परमेश्वरावरील परमश्रद्धा म्हणते, ‘हे काम झालेच आहे !’

९. मानवी जीवन !

परमेश्वराने देणगी दिलेल्या देहाचा उपयोग नेहमी सत्कर्मासाठी करावा. ‘इतरांच्या त्रासाला आपला देह कारणीभूत होणार नाही’, याची नेहमी काळजी घ्यावी.

१०. योग्य आचार-विचार !

दुसऱ्याच्या आधाराची अपेक्षा करत राहिलो, तर कधीच उभे रहाता येणार नाही; म्हणूनच धडपडत का होईना; पण स्वत:च्या हिमतीवर उभे राहून स्वावलंबी होणे इष्ट !