संभाजीनगर येथे पाणीपट्टी २ सहस्र रुपयांनी अल्प करण्यात येणार ! – सुभाष देसाई, पालकमंत्री

पालकमंत्री सुभाष देसाई

संभाजीनगर – शहरात ८ दिवसांआड पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या संभाजीनगरकरांमध्ये महापालिका आणि राज्य सरकार यांच्या विरोधात तीव्र असंतोष आहे. गेल्या १ मासापासून आंदोलनेही केली जात होती. विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक ४ सहस्र ५० रुपये पाणीपट्टी भरूनही शहरात वर्षातून केवळ ५५ दिवसच पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे ‘एक तर प्रतिदिन पाणी द्या, अन्यथा पाणीपट्टी निम्म्याने अल्प करा’, अशी मागणी जोर धरत होती. नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत प्रतिदिन पाणी देणे महापालिकेला शक्य नाही. त्यामुळे अखेर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जनक्षोभ अल्प करण्यासाठी २ सहस्र रुपये पाणीपट्टी अल्प करण्याचा निर्णय पालकमंत्री सुभाष देसाई यांनी १३ मे या दिवशी घेतला. या निर्णयामुळे शहरातील अनुमाने १ लाख २५ सहस्र अधिकृत नळधारकांचे २५ कोटी रुपये या वर्षीपासून वाचणार आहेत.

१. ‘स्मार्ट सिटी’च्या कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा’चे कार्यकारी अभियंता अजयसिंग आदी उपस्थित होते.

२. ‘समांतर योजने’तून प्रतिदिन २४ घंटे पाणी देण्याचे आश्वासन देऊन महापालिकेने वर्ष २०१०-११ मध्ये पाणीपट्टी १ सहस्र ८५० रुपयांवरून थेट ४ सहस्र ५० रुपये केली आहे. ही योजना झालीच नाही; पण वाढीव पाणीपट्टीचा बोजा कायम राहिला. आधीचे नियम रहित करता येणार नाहीत, असे म्हणत महापालिका पाणीपट्टी अल्प करत नव्हती.