श्रीराम, श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सव सोहळ्याची महती !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव म्हणजे सर्व साधकांसाठी आनंदाची पर्वणी असते. ‘जन्मोत्सव’ हा शब्द ‘जन्म’ आणि ‘उत्सव’ या दोन शब्दांच्या युतीने आला आहे. आपल्या ऋषींनी ‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जन्मोत्सवाचे क्षण कसे होते ?’, याविषयी लिहिले आहे. भगवंताच्या जन्मापूर्वी काय काय घडते ? ‘त्याच्या जन्माच्या वेळी वातावरण कसे असते ?’, हे सर्व आज आपण पहाणार आहोत. ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाला आपण सर्वांनी भाव कसा ठेवायचा ?’, याविषयी थोडे जाणून घेऊया.
१. श्रीराम जन्मोत्सवाचे आनंददायी क्षण
१ अ. दशरथाच्या राजमहालातील सदस्य, दास-दासी, ऋषिमुनी, देवलोकातील देवता आणि स्वर्गलोक यांनी श्रीरामाच्या आगमनाची आतुरतेने वाट पहाणे : ‘श्रीरामाच्या जन्माची वेळ जवळ आली होती. अयोध्येत सर्वांना ठाऊक होते. दशरथाच्या घरी महाराणी कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा गर्भवती आहेत आणि कोणत्याही क्षणी त्या प्रसव होऊ शकतात. चैत्र शुक्ल नवमी जवळ येत होती. एकीकडे अयोध्येची प्रजा, दशरथाच्या राजमहालातील सदस्य, दास-दासी, मंत्री, सैनिक, तर दुसरीकडे ऋषिमुनी आणि त्यांचे शिष्य, देवलोकातील देवता अन् स्वर्गलोक श्रीरामाच्या आगमनाची वाट पहात होते.
१ आ. ‘निसर्गाच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेला भगवंत पृथ्वीवर येणार असल्याने निसर्गालाही पुष्कळ आनंद होणे आणि प्रकृती कुणाच्या तरी स्वागतासाठी शृंगार करून वाट पहात असणे : निसर्गालाही पुष्कळ आनंद झाला होता; कारण त्यांच्या उत्पत्तीला कारणीभूत असलेला भगवंत पृथ्वीवर येणार होता. आकाश निरभ्र होते. नदी-तलावात नेहमीपेक्षा अधिक आणि स्वच्छ पाणी होते. वायूचा स्पर्श मंद होता. पाऊस पुष्पवृष्टी केल्यासारखा पडत होता आणि सूर्याचे तेजही अंगाचा दाह न करणारे होते. ‘प्रकृती (निसर्ग) कुणाच्या तरी स्वागतासाठी शृंगार करून वाट पहात आहे’, असे वाटत होते. वातावरणात सर्वत्र आनंद होता.
१ इ. महाराणी कौसल्येच्या समोर ऋषिमुनी आणि आराध्यदैवत साक्षात् श्रीमन्नारायण त्यांच्या चतुर्भुज रूपात उभे असणे आणि ज्योती स्वरूपात दिसणारी चतुर्भुज श्रीविष्णूची आकृती कौसल्येच्या शरिरात विलीन होणे अन् क्षणात एका दिव्य बालकाचा जन्म होणे : चैत्र मासातील शुक्ल नवमी आली. पुनर्वसु नक्षत्र होते. महाराणी कौसल्येला ना प्रसववेदना झाली, ना त्या मूर्च्छित झाल्या. त्या सारख्या स्वतःचे डोळे चोळत होत्या. ‘समोर जे दिसत आहे, ते सत्य आहे का ?’, यावर त्यांचा विश्वासच बसेना; कारण त्यांच्या समोर वेदवेद्य (वेद जाणणारे) ऋषिमुनी आणि आराध्यदैवत साक्षात् श्रीमन्नारायण चतुर्भुज रूपात उभे होते. खोलीत सर्वत्र प्रकाश पसरला होता. थोड्या वेळात ज्योती स्वरूपात दिसणारी चतुर्भुज श्रीविष्णूची आकृती कौसल्येच्या शरिरात विलीन झाली आणि काही क्षणात एका दिव्य बालकाचा जन्म झाला. श्रीरामाचा जन्म होईपर्यंत कौसल्येच्या जवळ असलेल्या सर्व दासी समाधी अवस्थेत गेल्या होत्या. श्रीरामाचा जन्म होताच देवाने त्यांना जागृतावस्थेत आणले.
१ ई. श्रीरामाचा जन्म झाल्यावर घराघरात मंगलवाद्ये वाजणे आणि स्वर्गलोकातील देवतांनी आनंदाने पुष्पवृष्टी करणे : महाराणी कौसल्येच्या प्रसूतीगृहातील दासींनी कांस्य वाद्य वाजवायला आरंभ केला. ते ऐकताच राजमहालातील वादकांनी मंगलवाद्य वाजवायला प्रारंभ केला. मंगलवाद्य ऐकताच अयोध्येतील घराघरात लोक वाद्य वाजवायला लागले, तर काही जण संगीत आणि नृत्य करायला लागले. सर्व ऋषिमुनींच्या आश्रमातही मंगलवाद्ये वाजवण्यात आली आणि स्वर्गलोकातील देवतांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. श्रीरामाच्या जन्माचा क्षण सर्वांसाठी आनंदाचा क्षण होता.
२. श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे मंगलमय क्षण
२ अ. श्रीमन्नारायणाने सर्वांना भाव समाधीत ठेवल्याने यशोदेच्या जवळ बाळाचे आगमन झाल्याचे प्रसूतीगृहात कुणालाही न कळणे आणि गोकुळात श्रीकृष्णाचा खरा जन्मोत्सव साजरा होणे : देवकी आणि वसुदेवाच्या ठायी कारागृहात श्रीमन्नारायणाने श्रीकृष्ण रूप धारण केले; परंतु श्रीकृष्णाचा खरा जन्मोत्सव साजरा झाला, तो गोकुळात यशोदा आणि नंदराजाकडेच ! श्रीमन्नारायणाच्या आज्ञेनुसार वसुदेव गोकुळात येऊन यशोदेच्या प्रसूतीगृहात प्रवेश करतात आणि यशोदेजवळ बाळ श्रीकृष्णाला ठेवतात. श्रीमन्नारायणाने त्या सर्वांना भावसमाधीत ठेवल्याने यशोदेच्या जवळ बाळाचे आगमन झाल्याचे प्रसूतीगृहात कुणालाही कळले नाही. बाळ श्रीकृष्ण यशोदेच्या बाजूला हसत होते; मात्र दास-दासी, रोहिणी आदी सर्व स्तंभित झाले आहेत.
२ आ. रोहिणीने सर्वांना भावसमाधीतून बाहेर काढून बाळाच्या आगमनाची वार्ता सांगणे : बाळ श्रीकृष्णाने पाहिले, सर्वांचे त्याच्या मायेमुळे भान हरपले आहे. त्याने विचार केला, ‘माझ्या आगमनाचे यांना काही कळलेच नाही.’ त्यामुळे स्वयं श्रीकृष्ण रोहिणीमध्ये (वसुदेवाची पहिली पत्नी) प्रवेश करून तिच्या मुखातून बोलतो, ‘‘अगं सखींनो, तुम्ही सर्व झोपल्या आहात का ? ऊठा आणि जाऊन नंदराजाला संदेश द्या, ‘बालकाचा जन्म झाला आहे.’’ रोहिणीच्या मुखातून निघालेले हे शब्द कानावर पडताच सर्व दासींची भावसमाधी तुटते आणि त्यांची धावपळ चालू होते.
२ इ. यशोदा माता भगवंताने दिलेल्या भाव-समाधीतून बाहेर येणे आणि गर्भातील शिशु बालक रूपात भूमीवर पाहून तिला आश्चर्य वाटणे अन् ‘मायावी शक्तीच्या प्रभावाने हे झाले’, असे वाटून तिने दुष्टबाधा निवारणासाठी नरसिंहाचे ध्यान करणे : याच वेळी माता यशोदा भगवंताने दिलेल्या भाव-समाधीतून बाहेर येते आणि पहाते, गर्भातील शिशु बालक रूपात भूमीवर आहे. तिला आश्चर्य वाटते. ती बघते, तर बाळाचा रंग सावळा आहे. तिला वाटते, ‘कोणत्या तरी योगिनी किंवा मायावी शक्तीच्या प्रभावाने असे झाले असेल’; म्हणून ती लगेच दुष्टबाधा निवारणासाठी नरसिंहाचे ध्यान करते.
२ ई. श्रीकृष्ण जन्माचा संदेश मिळेपर्यंत नंदराजा चतुर्भुज श्रीविष्णूच्या भावसमाधीत मग्न असणे आणि भगवंताने दिलेल्या समाधी अवस्थेचे अनुभव घेणारे गोकुळातील जीव धन्य असणे : जोपर्यंत नंदराजाला श्रीकृष्णाच्या जन्माचा संदेश मिळत नाही, तोपर्यंत नंदराजा चतुर्भुज श्रीविष्णूच्या भावसमाधीत मग्न असतो. त्याला देहाचे भानही नसते. संदेश आल्यावर त्यांचीही समाधी स्थिती तुटते आणि तो हळूहळू भानावर येतो. भगवंत पृथ्वीवर आल्यावर त्याने दिलेल्या समाधी अवस्थेचे अनुभव घेणारे ते जीव धन्य आहेत. श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या वेळी सर्वांनी भावसमाधी अनुभवली.
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (११.५.२०२२)
श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ईश्वराच्या सगुण रूपातील जन्मोत्सव साधकांना भावविश्वात नेणारा असणे‘श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जन्म-महोत्सवाच्या वेळी काय काय घडले ?’, हे आपण पाहिले. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रत्यक्ष जन्माच्या वेळी काय काय घडले ?’, हे आपल्याला पुढे कोणत्यातरी माध्यमातून भगवंत नक्कीच सांगणार आहे; मात्र तोपर्यंत ‘आपण (गुरुदेवांच्या) परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी भाव कसा ठेवू शकतो’, ते पाहूया. १. ईश्वराने जगताच्या कल्याणासाठी पृथ्वीवर मनुष्यरूपात येणे आणि देहधारण करणेखरेतर ईश्वराला जन्म नसतो. तो अनादि आणि अनंत आहे. त्याचा जन्म म्हणजे त्याच्या पृथ्वीवरील सगुण रूपातील आगमनाचा क्षण आहे. तो जगताच्या कल्याणासाठी पृथ्वीवर मनुष्यरूपात येतो आणि देहधारण करतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव साजरा करणे, म्हणजे ईश्वराच्या सगुण रूपातील अवतरणाचा उत्सव साजरा करणे होय. २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव ईश्वराच्या सगुण रूपाचा आनंद घेण्याचा क्षणनिर्गुण ईश्वर भक्तांना आनंद देण्यासाठी सगुणात येतो. आनंददायी अवतारी लीला करतो आणि परत निर्गुणातच विलीन होतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सवही आपल्या सर्वांसाठी निर्गुण ईश्वराच्या सगुण रूपाचा आनंद घेण्याचा क्षण आहे. ३. अवतारांच्या जन्मोत्सवाचा आनंद साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या जन्मोत्सवाला देणार असणेसप्तर्षि जीवनाडीपट्टीत सप्तर्षींनी अनेक वेळा असा उल्लेख केला आहे, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन्ही अवतारांचे तत्त्व आहे.’ गुरुदेव कधी श्रीरामासारखे असतात, तर कधी श्रीकृष्णासारखे असतात. जो वैकुंठपती, श्रीहरि नारायण श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रूपात आला, तोच आता आम्हा साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपात आला आहे. ४. भगवान श्रीविष्णूचे चैतन्य अनुभवण्यासाठी साधकांना जन्मोत्सव साजरा करण्याची संधी मिळणेपरात्पर गुरु डॉ. आठवले (गुरुदेवांच्या) यांच्या जन्माच्या वेळी भगवान श्रीविष्णूचे जे चैतन्य पृथ्वीवर आले, त्याची अनुभूती साधकांनाही मिळावी; म्हणून गुरुदेव आम्हा साधकांना आता जन्मोत्सव साजरा करण्याची संधी देत आहेत. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. ५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव हा साक्षात् श्रीविष्णूचाच जन्मोत्सव !पृथ्वीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व, म्हणजे साक्षात् श्रीविष्णूचे अस्तित्व होय. श्री गुरूंच्या जन्मोत्सवाला आपण असा भाव ठेवूया की, आपण सर्व साधक ‘साक्षात् श्रीविष्णूचाच, म्हणजेच साक्षात् श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा जन्मोत्सव साजरा करत आहोत.’ श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जन्माच्या वेळी अयोध्यावासियांनी अन् गोकुळवासियांनी जी भावसमाधी अनुभवली, ती स्थिती अनुभवण्यासाठी भावावस्थेत रहाण्याचा प्रयत्न करूया. श्रीमन्नारायणाच्या चरणी प्रार्थना करूया की, ‘देवा, गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या माध्यमातून आम्हा साधकांना तुझे चैतन्य आणि आशीर्वाद लाभणार आहे. आम्हा साधकांना या जन्मोत्सवाचा चैतन्याच्या स्तरावर लाभ घेता येऊ दे.’ ६. आपण सर्व साधक या जन्मोत्सवाच्या निमित्ताने श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञताभावात राहून नामस्मरणसहित सेवारत राहूया. श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा विजय असो !’ – श्री. विनायक शानभाग, चेन्नई, तमिळनाडू. (११.५.२०२२) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |