नागपूर येथील ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये साधक आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त सहभाग !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव !

दिंडीत सहभागी झालेल्या महिला

नागपूर, १४ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त नागपूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. येथील प्रतापनगरच्या श्री दुर्गादेवी मंदिरातून दिंडीचा आरंभ झाला. त्यानंतर मुख्य मार्गाने जाऊन त्याच मंदिरात दिंडीचा समारोप करण्यात आला. स्थानिक बेलतरोडीच्या गुरुकृपा सेवाश्रमचे संस्थापक अध्यक्ष पू. भागीरथी महाराज यांच्या मंगल हस्ते धर्मध्वज आणि परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र असलेली पालखी यांचे भावपूर्ण पूजन करण्यात आले.

उपस्थितांना आशीर्वादपर मार्गदर्शन करतांना पू. भागीरथी महाराज म्हणाले, ‘‘जेथे प्रकाश असतो, तेथे दिवा लावण्याची आवश्यकता नसते. दिंडीत सगळेच देशाच्या अखंडतेसाठी साधना करणारे कर्मयोगी आहेत. त्यामुळे दुर्गादेवीच्या आशीर्वादाने सगळेच प्रकाशमान होत आहेत. आपण प्रतिदिन विश्वकल्याणासाठी प्रार्थना करून ‘हिंदु एकता दिवस’ साजरा करत असतो.’’

दिंडीचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अधिवक्त्या (सौ.) वैशाली परांजपे यांनी केले आणि समारोपीय मार्गदर्शन सौ. गौरी जोशी यांनी केले. या दिंडीमध्ये २०० हून अधिक साधक आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.

अनुभूती

१. नागपूर येथील सनातनच्या अनेक वयस्कर साधिकांना पायदुखी आणि अन्य व्याधी आहेत, तरीही त्यांनी प्रतिदिन दिंडीचा प्रसार केला, तसेच दिंडीत सहभाग घेतला; पण त्यांना कोणताही त्रास जाणवला नाही.

२. नागपूरमध्ये ४० डिग्रीच्या वर तापमान असूनही इतरवेळी जाणवणारा उकाडा आणि झळा दिंडीच्या वेळी जाणवल्या नाहीत.

क्षणचित्रे

१. रणरागिणी पथक आणि बालसाधक यांनी ध्वनीक्षेपकावरून धर्माचरणाच्या कृतींविषयी माहिती दिली. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

२. धर्माचरणाच्या कृतींचे हस्तफलक जिज्ञासू उत्सुकतेने वाचत होते.

३. भजनी मंडळाच्या भजनांनी वातावरण भावपूर्ण झाले होते.

४. युवा साधक श्रीवल्लभ जोशी याने लाठीकाठी आणि दंडसाखळी यांचे प्रात्यक्षिक दाखवले. यामुळे उपस्थितांमध्ये वीरश्री निर्माण झाली.

५. ‘सनातन प्रभात’चे अनेक वाचक आणि समाजातील धर्माभिमानी यांनी दिंडीच्या मार्गात रांगोळ्या काढल्या, तसेच पुष्पवृष्टी आणि औक्षण केले. औक्षण करणाऱ्यांच्या घरातील सर्व सदस्यांनीही दिंडीचे भावपूर्ण दर्शन घेतले, तसेच त्यांनी दिंडीतील साधकांना सरबत, गारपाणी आणि खाऊ देण्याची सेवा केली.

अभिप्राय

१. ही दिंडी सामान्य नसून दैवी आहे. – श्री. अश्विन ढाले, हितचिंतक

२. सनातन संस्थेच्या आतापर्यंतच्या अनेक कार्यक्रमांहून या दिंडीमध्ये अधिक आनंद जाणवला. – दिंडीत सहभागी झालेले सर्वजण