स्वर्गलोकाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि साधना करण्याचे महत्त्व
१. स्वर्गलोकातील जिवांना सुखासमवेत काही प्रसंगी दुःखही भोगावे लागणे
‘स्वर्गलोकातील जीव तेथे मोठ्या प्रमाणात सुख उपभोगत असतात; परंतु काही प्रसंगी त्यांच्या वाट्याला दुःखही येते.
स्वर्गलोकात मिळणाऱ्या सुखाचे वर्णन करणारी ओवी
स्वर्गसुखाची गोडी । नसे थोडी थोडकी ।
अमाप ते सुख । असे समीप ।।
अर्थ : स्वर्गलोकातील जिवांना तेथे मिळणारे सुख मोठ्या प्रमाणात मिळते. तेथील अमाप सुख जिवांच्या अगदी जवळ असते.
१ अ. स्वर्गलोकातील जिवांच्या वाट्याला दुःख येण्यामागील कारणे
१ अ १. सुखाची अपेक्षा पूर्ण न झाल्याने दुःख होणे : तेथील जिवांना विविध प्रसंगांत सुखाची अपेक्षा असते, त्या प्रमाणात त्यांना सुख न मिळाल्यास दुःख होते, उदा. स्वर्गलोकातील अप्सरांचे नृत्य पाहून मनाचे समाधान न झाल्यास दुःख होणे
१ आ २. मनाप्रमाणे न झाल्याने दुःख होणे : स्वर्गात पुष्कळ सुख असले, तरी तेथे काही नियम आणि मर्यादा आहेत, उदा. अप्सरांचे नृत्य जर इंद्राने काही कारणास्तव थांबवले, तर तेथील जिवांना दुःख होते.
२. स्वर्गातील जिवांना सुख आणि दुःख यांचा अनुभव झाल्याने होणारे लाभ
२ अ. जिवांना स्वर्गातून सुटण्याची इच्छा होणे : स्वर्गात सतत सुख आणि दुःख यांचा अनुभव आल्याने तेथील काही जिवांच्या लक्षात येते की, स्वर्गलोकातील वास्तव्याला काहीही अर्थ नाही. ‘मला शाश्वत आनंद हवा आहे’, या विचाराने अशा जिवांना स्वर्गातून सुटण्याची इच्छा होते.
२ आ. परत स्वर्गात न येण्यासाठी साधना करणे : स्वर्गातील सुख आणि दुःख उपभोगण्याचा कार्यकाळ संपला की, असे जीव परत पृथ्वीवर जन्माला येतात. त्यातील काही जिवांना स्वर्गलोकातील निरर्थकता लक्षात येते, तेव्हा त्यांच्यात स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्म घेण्यापूर्वीच परत स्वर्गात न येण्याची इच्छा निर्माण होते आणि त्यासाठी ते शाश्वत आनंदप्राप्तीचा मार्ग शोधण्यासाठी पृथ्वीवर योग्य गुरूंचा अथवा योग्य साधनामार्गाचा शोध घेतात.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |