सप्तर्षींनी सांगितलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे महान समष्टी कार्य करत आहेत. या कार्यात अडथळे आणण्यासाठी मोठ्या वाईट शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले, तसेच त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यावर सूक्ष्मातून आक्रमणे करतात. ही आक्रमणे नष्ट व्हावी, यासाठी सप्तर्षींनी आध्यात्मिक स्तरावरील विविध उपाय करण्यास सांगितले आहेत. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने या आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात येत आहे. यातील एक संशोधन पुढे दिले आहे.
१. सप्तर्षींनी सांगितलेले आध्यात्मिक उपाय
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर होत असलेली आक्रमणे नष्ट होण्यासाठी सप्तर्षींनी पुढील उपाय करण्यास सांगितले.
१ अ. ४.८.२१ या दिवशी करावयाचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय : तुरटीची भुकटी करून ती एका पुरचुंडीत बांधावी. ही पुरचुंडी झोपतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या उशीखाली ठेवावी. दुसऱ्या दिवशी ही पुरचुंडी वहात्या पाण्यात विसर्जन करावी.
१ आ. ६.८.२०२१ या दिवशी करावयाचे उपाय : तुरटीची भुकटी आणि कडुनिंबाची ३-४ कोवळी पाने घेऊन त्याची पुरचुंडी बांधावी. तसेच सेंद्रिय साखर (Brown Sugar) आणि जिरे यांचीही एक पुरचुंडी बांधावी. या दोन्ही पुरचुंड्या झोपण्यापूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांच्या उशीखाली ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी दोन्ही पुरचुंड्या वहात्या पाण्यात विसर्जन कराव्यात.
सप्तर्षींनी सांगितल्यानुसार वरील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यात आले. हे उपाय करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तिन्ही पुरचुंड्यांच्या ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
२. उपायांनंतर पुरचुंड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून येणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या उशाखाली ठेवलेल्या तिन्ही पुरचुंड्यांमध्ये आरंभी (उपायांपूर्वी) नकारात्मक काहीच नसून सकारात्मक ऊर्जा होती. उपायांनंतर मात्र तिन्ही पुरचुंड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली. विशेष म्हणजे ६.८.२०२१ या दिवशी केलेल्या उपायांनंतर पुरचुंड्यांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. हे पुढील सारणीतून लक्षात येते.
२ अ. उपायांनंतर पुरचुंड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून येण्यामागील कारण : परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण व्हावे यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या माध्यमातून सप्तर्षींचा संकल्प कार्यरत झाला. सप्तर्षींनी सांगितल्यानुसार केलेल्या उपायांमुळे परात्पर गुरु डॉक्टरांवर होणारी वाईट शक्तींची आक्रमणे रोखण्यासाठी पुरचुंड्यांतील चैतन्य कार्यरत झाले. पुरचुंड्यांतील चैतन्याचे वाईट शक्तींशी सूक्ष्म युद्ध झाले. याचा परिणाम म्हणून उपायांनंतर पुरचुंड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळून आली. विशेष म्हणजे ६.८.२०२१ या दिवशी केलेल्या उपायांनंतर पुरचुंड्यांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. उपायांचा उद्देश सफल झाल्याचे हे द्योतक आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या संशोधकवृत्तीमुळे आम्हा साधकांना हे सर्व शिकायला मिळत आहे, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.१२.२०२१)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |