संपानंतर एस्.टी.च्या १३ सहस्र गाड्या सेवारत; प्रवाशांच्या संख्येत मात्र घट !
मुंबई, १३ मे (वार्ता.) – राज्यातील एस्.टी. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन २१ दिवस झाले, तरी अद्याप एस्.टी.च्या सर्व गाड्या पूर्ववत् धावू लागलेल्या नाहीत. सद्यस्थितीत १३ सहस्र १४७ एस्.टी. बस सेवारत झाल्या असून एकूण बसगाड्यांच्या तुलनेत हे प्रमाण ८४ टक्के आहे. १४ टक्के गाड्या अद्यापही सेवारत झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येतही घट आहे.
संपापूर्वीच्या तुलनेत बसगाड्यांचा प्रवास ८० टक्के आहे. सद्यस्थितीत एस्.टी. ने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसाला सरासरी २९ लाखापर्यंत पोचली आहे. संपापूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत हे प्रमाण ७० टक्के इतके आहे. त्यामुळे प्रवासी वाढवण्यासाठी परिवहन विभागाला प्रयत्न करावे लागणार आहेत. याविषयी कोणत्या मार्गावर एस्.टी. गाड्या चालू केल्याने उत्पन्न वाढू शकेल, या दृष्टीने परिवहन विभागाचा अभ्यास चालू असल्याचे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. संपानंतर दिवसाला सरासरी एस्.टी. तून १७ कोटी रुपये इतके उत्पन्न मिळत आहे. संपापूर्वीच्या उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण ८५ टक्के इतके आहे. संप मागे घेतल्यानंतर १०० टक्के म्हणजे ८२ सहस्र एस्.टी. कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत, असे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘लालपरी’ नव्या रंगात! ‘या’ मार्गावर धावणार पहिली इलेक्ट्रिक बस https://t.co/mbzu9xl0HR #MSRTC #STBUS #electricbus #Ahmednagar @msrtcofficial
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) May 12, 2022
राज्य मार्ग परिवहन महामंडळात १५० इलेक्ट्रिक बस येणार !
मुंबई, १३ मे (वार्ता.) – राज्यातील परिवहन महामंडळात इलेक्ट्रिकच्या १५० गाड्या घेण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) सुहास जाधव यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली. प्रारंभी राज्यातील मुख्य शहरांमध्ये या गाड्या धावणार आहेत. या गाड्यांच्या चार्जिंगसाठी ६ ठिकाणी ‘चार्जिंग’ केंद्रे उभारण्यात येणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या केंद्रशासनाच्या ‘फेम २’ या योजनेच्या अंतर्गत या बस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती या वेळी जाधव यांनी दिली.