पुणे रेल्वे स्थानक आवारातील वस्तू स्फोटके नसून फटाके होते ! – पुणे रेल्वे विभाग
पुणे, १३ मे (वार्ता.) – पुणे रेल्वे स्थानक आवारात १३ मे या दिवशी बाँबसदृश वस्तू आढळल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. त्याचा खुलासा करत ‘पुणे स्थानक आवारात मिळालेल्या वस्तू स्फोटके नसून फटाके होते’, असे पुणे रेल्वे विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त उदय सिंह पवार यांनी सांगितले. १३ मे या दिवशी दुपारी काही प्रत्यक्षदर्शींना बाँबसदृश वस्तू असल्याचे लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर बाँबशोधक आणि नाशक पथक बोलावण्यात आले. विविध पोलीस यंत्रणाही घटनास्थळी उपस्थित झाल्या. त्या परिसरातील नागरिकांना बाहेर काढून सर्व परिसर रिकामा करण्यात आला. बाँबसदृश वस्तू स्थानकापासून जवळ असलेल्या महाविद्यालयाच्या मोकळ्या मैदानावर नेण्यात आली. पोलीस आणि रेल्वे सुरक्षा प्रशासन यांनी पडताळणी करून ही वस्तू म्हणजे केवळ फटाके असल्याचा निर्वाळा दिला. काही दिवसांपूर्वी पुणे स्थानकावर बाँब ठेवल्याची खोटी माहिती काही व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर भ्रमणभाष करणाऱ्या व्यक्तींना कह्यात घेण्यात आले होते. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने पुढील कारवाई चालू ठेवली आहे.