नागपूर येथे म्हातारपणातील आधारासाठी ३ लाखांत बाळाची खरेदी !

  • स्वार्थासाठी वाटेल त्या थराला जाण्याचा माणुसकीशून्य प्रकार !

  • शिक्षिकेसह तिघांना अटक !

प्रतीकात्मक छायाचित्र

नागपूर – म्हातारपणी आधार मिळण्यासाठी एका शिक्षिकेने अनुमाने ३ वर्षांपूर्वी एका मुलाला दलालांद्वारे ३ लाख रुपयांमध्ये विकत घेतले होते; मात्र त्याच महिलेच्या मोठ्या मुलाने या प्रकरणाची गुन्हे शाखेकडे तक्रार प्रविष्ट केल्यामुळे मानव तस्करीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३ महिलांसह एका दलालाला अटक केली. अटक झालेल्या २ महिला एका रुग्णालयातील परिचारिका आहेत.

१. दोन मुले आणि पती असे शिक्षिकेचे कुटुंब आहे. मोठा मुलगा त्यांना चांगली वागणूक देत नाही, तर दुसऱ्या मुलाने काही वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामुळे महिला एकटी पडल्याने तिने मूल दत्तक घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यात यश न आल्याने ‘टेस्ट ट्यूब बेबी’साठीही प्रयत्न केले. त्यातही यश मिळाले नाही.

२. त्या कालावधीत रुग्णालयातील २ परिचारिका त्यांच्या संपर्कात आल्या. त्यांनी बाळासाठी सलामुल्ला खान या दलालाशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याने तिला ३ लाख रुपयांमध्ये बाळ उपलब्ध करून दिले. ३ वर्षे ही गोष्ट लपून राहिली; मात्र महिलेच्या मोठ्या मुलाला याविषयी समजल्यावर पोलिसांनी गुप्त अन्वेषण चालू केले. त्यानंतर वरील कारवाई करण्यात आली.

३. ‘सलामुल्ला खान याने महिलेला विक्री केलेले बाळ हे कुमारी मातेचे असावे’, असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी बाळाच्या आईचा शोध चालू केला आहे. मुख्य आरोपी सलामुल्ला खान याची नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे बालगृह नावाची एक संस्था आहे. तसेच तो अत्याचारपीडित महिलांच्या उद्धारासाठी ‘आश्रयगृह’ ही संस्था चालवतो. ‘त्यातून संपर्कात आलेल्या महिलांचे बाळ तो विक्री करत आहे’, असा संशय पोलिसांना आहे.