उत्पन्न वाढीसाठी बसस्थानकांच्या जागा भाड्याने देण्यासाठी एस्.टी. महामंडळ सर्वेक्षणाच्या सिद्धतेत !
मुंबई, १२ मे (वार्ता.) – आर्थिक स्थिती खालावल्यामुळे उत्पन्न वाढीसाठी एस्.टी. महामंडळाकडून प्रयत्न चालू आहेत. या अंतर्गत बसस्थानकांच्या मोक्याच्या कोणत्या जागा भाड्याने देता येतील ? याविषयी तज्ञांकडून सर्वेक्षण करण्याच्या विचाराधीन असल्याची माहिती परिवहन विभागातील एका अधिकाऱ्यांनी दिली.
१. राज्यात एस्.टी. महामंडळाची एकूण ८१२ बसस्थानके आहेत. वर्ष २००१ पासून यांतील काही बसस्थानकांवरील ४५ प्रकल्प भाड्याने देण्यात आले आहेत. यांतून एस्.टी. महामंडळाला एकूण ३२ कोटी रुपये मिळाले. भविष्यातही ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ ही संकल्पना वाढवण्यासाठी महामंडळ प्रयत्नरत आहे. यासाठी बसस्थानकांच्या जागा भाड्याने देऊन उत्पन्न वाढीसाठी एस्.टी.महामंडळाने प्रयत्न चालू केले आहेत.
२. ही संकल्पना विस्तारित करण्यासाठी भाड्याने देण्याच्या नियमांमध्ये काही पालट करण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे. यापूर्वी जागा भाड्याने देण्याचा ३० वर्षांचा कालावधी ६० वर्षांचा करण्याचा विचार एस्.टी. महामंडळ करत आहे.
३. कालावधी वाढल्यास गुंतवणूक करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या वाढेल. सद्यस्थितीत काही लोकप्रतिनिधी, व्यावसायिक आदी १२५ जणांनी राज्यातील विविध ठिकाणच्या एस्.टी. महामंडळाच्या जागा भाड्याने घेण्याची सिद्धता दर्शवली आहे.
४. बसस्थानकांच्या जागा दिसायला अधिक वाटत असल्या, तरी त्या ठिकाणी बसगाड्या येण्या-जाण्यासाठी, तसेच वळवण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेचा विचारही करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागांत इमारतींच्या स्वरूपात व्यावसायिक गाळ्यांची संकल्पना अद्यापही रुजलेली नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून मगच बसस्थानकांच्या कोणत्या जागांवर कशा प्रकारचे प्रकल्प उभारायचे ? हे निश्चित करावे लागणार आहे. ‘यासाठी आम्ही केवळ व्यावसायिक गाळ्यांपुरती मर्यादित न रहाता वैद्यकीय सुविधा आणि सामाजिक संस्था यांनाही जागा भाड्याचे देण्याचा आमचा विचार आहे’, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.