फळझाडांची लागवड करतांना घ्यावयाची काळजी !

जून मासात पावसाळा चालू होत आहे. या कालावधीत फळझाडांची लागवड केल्यास सोपे जाते. असे असले तरी त्याची पूर्वसिद्धता आतापासूनच कशी करावी, याविषयीची माहिती येथे देत आहोत.

१. फळझाडांची लागवड करण्यासाठी खड्डे भरण्याची पद्धत

अ. खड्डयांचे आकारमान : १ x १ x १ मीटर (खड्ड्याची लांबी, रुंदी आणि खोली)

आ. खड्डा भरण्यासाठी लागणारे साहित्य : निंबोळी पेंड १ ते २ किलो आणि क्लोरोपायरीफॉस १.५ टक्के पावडर १०० ग्रॅम, शेणखत २ ते ३ पाटी, सिंगल सुपर फॉस्फेट १ किलो

इ. खड्डा भरण्याची पद्धत : प्रथम खड्ड्यातील माती काढून बाजूला घ्यावी आणि खड्ड्याला योग्य आकार द्यावा. खड्डा भरण्यापूर्वी १.५ टक्के क्लोरोपायरीफॉस १०० ग्रॅम पावडर खड्ड्याच्या तळाशी आणि आजूबाजूने टाकावी. वरील सर्व साहित्य खड्ड्यातून काढलेल्या मातीमध्ये मिसळून घ्यावे. पुन्हा सर्व माती खड्ड्यामध्ये घालावी; पण ती भूमीवर ६ ते ९ इंच ठेवावी.

ई. खड्डे काढणे आणि भरणे यांचा कालावधी : मे मासाचा तिसरा आठवडा ते मे अखेरपर्यंत

खात्रीशीर रोपे मिळण्याची ठिकाणे

१. Central Coastal Agricultural Research Institute, Old Goa, Ph. (0832) 2284677.
२. महाराष्ट्रातील कृषी विद्यापिठे, शासकीय कृषी महाविद्यालये, संशोधन केंद्रे, तसेच खात्रीशीर रोपवाटिका

– डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण

डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण

२. रोपे लावण्याची पद्धत

अ. नारळ : नारळाच्या खोडाचा ३ ते ४ इंच भाग मातीमध्ये राहील, अशा पद्धतीने भरलेल्या खड्ड्याच्या मध्यभागी खोऱ्याने खड्डा काढावा. त्यामध्ये तळाशी मूठभर निंबोळी पेंड टाकावा. त्यावर नारळावर आणि २ इंच खोडापर्यंत १.५ टक्के क्लोरोपायरीफॉस पावडर टाकावी. त्यामुळे रोपांचे वाळवी आणि इतर कीड यांच्यापासून रक्षण होईल. रोप लावल्यानंतर माती पायाने दाबून घ्यावी. वरील पद्धत अन्य फळझाडांसाठीही वापरू शकतो. रोपे शक्यतो एक वर्षाची असावी. पुष्कळ जुनी रोपे वापरू नयेत. रोपे लावल्यानंतर पावसाने खड्डा आणखी दबू शकतो. त्यामुळे खड्ड्यात पाणी साचणार नाही, अशा पद्धतीने पुन्हा माती भरावी. मातीमध्ये ५ किलो गोमय वापरू शकतो.

टीप १ : कलम केलेल्या रोपांची लागवड करण्यापूर्वी प्लास्टिकची पिशवी धारधार चाकूने अलगद बाजूला काढून घ्यावी. कलमाच्या जोडाच्या ठिकाणी बांधलेला प्लास्टिकचा कागदही काढून घ्यावा.
टीप २ : आंबा, चिकू, काजू आणि इतर फळझाडांच्या रोपांचे कलम केलेला भाग भूमीपासून ४ ते ६ इंच वर राहील, याची काळजी घ्यावी.
टीप ३ : पावसाळ्यात झाडाच्या खड्ड्यात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.

आ. रोपे लागण करण्याची वेळ : जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर आणि हवेमधील उष्णता न्यून होऊन हवामानात पालट झाल्यावर जून अखेरपर्यंत रोपाची लागण करून घ्यावी, म्हणजे जुलैमध्ये मोठा पाऊस चालू होण्यापूर्वी रोपांची वाढ होईल.

३. रोप लावणीचे अंतर

अ. आंबा

१. पारंपरिक लागवड पद्धत : १० x १० मीटर
२. घन लागवड पद्धत : ५ x ५ मीटर (हाय डेन्सिटी)
३. अतिघन लागवड पद्धत : ४ x २ मीटर (अल्ट्राहाय डेन्सिटी)

आ. नारळ : मातीच्या प्रकारानुसार ७.५ x ७.५ मीटर किंवा ८ x ८ मीटर लागवड करावी.

इ. चिकू : १० x १० मीटर

डहाणू तालुक्यातील (जिल्हा पालघर) शेतकऱ्यांनी चिकू लागवडीसाठी नवीन पद्धत विकसित केली आहे. प्रथम १० x ५ मीटर अंतरावर झाडांची लागवड केली. काही वर्षांनी झाडे गर्द वाढल्यावर ५ मीटर अंतरावरील एक आड एक झाड काढून अन्य झाडांना वाढण्यास जागा उपलब्ध केली. लागवडीचे अंतर १० x १० मीटरमध्ये केले. त्यामुळे जागेचा पुरेपूर वापर होऊन पहिल्या काही वर्षांत अधिक उत्पादन घेणे शक्य झाले.

ई. काजू : मातीच्या प्रकारानुसार ७ x ७ मीटर किंवा ८ x ८ मीटर अंतरावर लागवड करावी.

४. फळझाडांचे सुधारित वाण (जाती)

अ. आंबा : हापूस, रत्ना, सिंधू, केसर, पायरी (आमरसासाठी), कोकण रूची (लोणच्यासाठी), सुवर्णा, कोकणराजा, कोकणसम्राट, ऑस्टिन आणि लीली

आ. नारळ : बाणवली, प्रताप, लक्षद्वीप आणि शहाळ्यासाठी ऑरेंज ड्वार्फ (orange dwarf) (टीप : संकरित (हायब्रिड) जातीमध्ये अनेक समस्या असतात. त्यामुळे शक्यतो त्यांचा वापर करणे टाळावे.

इ. चिकू : कालिपती (कालिपती जात खाण्यासाठी चांगली असते आणि त्यातून उत्पन्नही चांगले मिळते), क्रिकेट बॉल

ई. काजू : वेंगुर्ला १, वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ७ आणि वेंगुर्ला ८ (टीप : वेंगुर्ला ४ आणि ७ मध्ये काजूगराचा आकार मोठा असल्याने निर्यातीसाठी चांगले असते.)

उ. कोकम : कोकण अमृता, कोकश हातीस

ऊ. फणस : कोकण प्रॉलिफीक (कापा फणस), बरका फणस, नीर फणस

ए. जांभूळ : कोकण बहाडोली

ऐ. आवळा : कृष्णा, कांचन, एन्.ए. ७, एन्.ए. १० आणि चकय्या

ओ. करवंद : कोकण बोल्ड

औ. सुपारी : श्रीवर्धनी

अं. अननस : क्यू, क्वीन

क. केळी : बसराई, जी ९, श्रीमंती, हरिसाल, कोकण सफेद वेलची, मुठेळी, राजेळी

ख. मसाला पिके

दालचिनी : कोकण तेज

जायफळ : कोकण सुगंधा, कोकण स्वाद, कोकण श्रीमंती आणि कोकण संयुक्ता

– डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (एम्.एस्.सी. (कृषी), पी.एचडी.), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.