गोव्यातील कुप्रसिद्ध इन्क्विझिशन (धर्मसमीक्षण सभा)

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

‘गोवा इन्क्विझिशन’च्या काळात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होऊनही फ्रान्सिस झेवियरला ‘गोयंचो सायब’ म्हणणे कितपत योग्य ?

गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी एक डॉ. त्रिस्ताव ब्रागांझ कुन्हा म्हणजेच डॉ. टी.बी. कुन्हा यांना गोमंतकाच्या ‘आधुनिक स्वातंत्र्यसंग्रामाचे जनक’ म्हणून ओळखले जाते. डॉ. टी.बी. कुन्हा यांनी ‘गोमंतकियांचे अराष्ट्रीयीकरण कसे झाले आहे ?’, याचा साद्यंत इतिहास त्यांच्या ‘डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स’ या पुस्तकातून मांडला आहे. १२ मे या दिवशी आपण ‘सक्तीने धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्त्यांनी योजलेले उपाय आणि पाद्र्यांची लोभी वृत्ती !’, यांविषयी वाचले. आज त्यापुढील भाग येथे देत आहोत.

‘गोव्यातल्या इन्क्विझिशनबद्दल वाटणारी धडकी,  अंधारकोठडीत भोगाव्या लागणाऱ्या यातना, त्याच्या दंडातले क्रौर्य आणि रानटीपणा खुद्द आर्चबिशप इव्हाराने निःपक्षपाती साक्षीत मान्य केले आहे. लिस्बनला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणतात, ‘‘कुठेही ‘इन्क्विझिशन’ हे कुप्रसिद्ध कोर्ट असले आणि ही कुप्रसिद्धी कितीही हिणकस, भ्रष्ट अन् स्वार्थी असली, तरी तिची गोव्यातील ‘इन्क्विझिशन’शी तुलना होऊ शकणार नाही. या ‘इन्क्विझिशन’ला ‘होली ऑफिस’ म्हणणे हा दैवदुर्विलास ! या ‘इन्क्विझिर्टस’ची मजल इथवर पोचली होती की, ज्या स्त्रियांनी त्यांच्या पाशवी वासनेला बळी पडण्यास प्रतिकार केला, त्यांना कारागृहात पाठवून तिथे त्यांचा उपभोग घेऊन नंतर त्यांना पाखंडी म्हणून जाळण्यास त्यांनी कमी केले नाही.’’

डॉ. टी.बी. कुन्हा

१२. गोव्यातील ख्रिस्ती धर्मसभेचे आदेश

‘भयाण आठवण देणारे हे (इन्क्विझिशन) कोर्ट थोरल्या गोव्यामध्ये ‘ओरले गोर’ (व्हडले घर) येथे अस्तित्वात होते. १४.४.१७३६ च्या आपल्या आदेशात त्याने फर्मान काढले, ‘‘कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर बहिष्कार घालण्यात येऊन सर्व ऐहिक आणि भौतिक दंड भोगावे लागतील’’ याच्या भल्या मोठ्या सूचीतील काही निवडक उदाहरणे देत आहोत.’ (पृष्ठ ३९-४०)

अ. घरात ओव्या म्हणण्यावर बंदी

‘‘इथल्या लोकांना आम्ही हुकूम देत आहोत की, कधीही कुठल्याही सबबीवर त्यांनी आपल्या घरात, खासगी किंवा जाहीररीत्या ओव्या म्हणायच्या नाहीत; कारण (हिंदु) धर्मियांमध्ये ही सवय नाहीशी झाली पाहिजे.’ (पृष्ठ ४०)

आ. भात शिजवण्याच्या पद्धतीवर निर्बंध

वरील लोकांना आम्ही असा हुकूम देतो की, त्यांनी मिठाविना शिजवलेला भात, नंतर मीठ घालून स्थानिक लोक करतात, तसे आपल्या जेवणात घेऊ नये.’ (पृष्ठ ४०)

इ. तुळस उपटण्याचा आदेश

‘वरील लोकांनी तसेच प्रदेशातील सर्व रहिवाशांना, पोर्तुगिजांनासुद्धा आम्ही हुकूम देतो की, त्यांच्या परिसरात, शेतात, जमिनीत कुठेही ‘तुळस’ नावाचे रोप आढळता कामा नये, कुठेही दिसल्यास ते तात्काळ उपटून टाकावे.’ (पृष्ठ क्र. ४०)

ई. हिंदु नावांवर बंदी

आम्ही वरील लोकांना तसेच प्रदेशातील सर्व रहिवाशांना, पोर्तुगिजांनासुद्धा हुकूम देतो की, कुठल्याही ख्रिस्ती व्यक्तीला हिंदु नावाने किंवा आडनावाने हाक मारायची नाही.

‘यापेक्षा अधिक जुलमी काय असू शकेल ? आम्ही काय खावे ? कसे रहावे ? काय नेसावे ? हे आमचे धनी आम्हाला सांगत. धोतर न नेसता फक्त ‘काष्टी’ नेसण्याचा हुकूम ख्रिस्त्यांना देण्यात धर्माचा कोणता लाभ असतो, ते कळणे कठीण आहे. दक्षिण हिंदुस्थानात कॅथॉलिक लोकांनी आपला हिंदी पेहराव आणि नावे तशीच ठेवली आहेत, तरी त्यांचे धर्माविषयीचे प्रेम अल्प झालेले नाही. आमच्या या असभ्य इन्क्विझिटर्सनी ‘वॅगॅनिझम’ (ख्रिस्ती नसलेल्या पद्धती) नष्ट करायच्या नावाखाली खासगी आयुष्यातल्या बारीकसारीक गोष्टीत ढवळाढवळ केली; पण इतकी कठोर कारवाई करूनसुद्धा त्या ‘दोषी’ ठरवलेल्या रिती गोव्यातल्या ख्रिस्त्यांमध्ये आजही शाबूत आहेत.’ – (पृष्ठ क्र. ४०)

(लेखातील दिलेले पृष्ठ क्रमांक  ‘गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास’ या पुस्तकातील आहेत. इंग्रजी लेखक : डॉ. टी.बी. कुन्हा, अनुवादक : प्रफुल्ल गायतोंडे)