‘गोवा मेडिकल कौन्सिल’मध्ये अपप्रकार आणि सरकारचा हस्तक्षेप !
वैद्यकीय परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. वळवईकर यांचा आरोप
पणजी – ‘गोवा मेडिकल कौन्सिल’ सध्या अटी आणि नियम यांच्याप्रमाणे कार्य करत नाही. परिषदेतील अपप्रकारांमध्ये वाढ झाली आहे आणि आधुनिक वैद्यांच्या (डॉक्टरांच्या) संदर्भात सरकारकडून हस्तक्षेप केला जात आहे, असा आरोप वैद्यकीय परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश वळवईकर यांनी केला आहे.
नोंदणीसाठी (‘रजिस्ट्रेशन’साठी) आधुनिक वैद्यांना ५ वर्षांत ३० क्रेडिट्स मिळवावे लागतात; मात्र काही आधुनिक वैद्य थेट आरोग्य मंत्रालयाकडून अनुमती मिळवून ‘रजिस्ट्रेशन’चे नूतनीकरण करवून घेत आहेत, असा आरोप केला जात आहे. ‘कौन्सिल’ला या प्रक्रियेत मंत्रालयाचा हस्तक्षेप अपेक्षित नाही. एका आधुनिक वैद्याने ‘गोवा मेडिकल कौन्सिल’मध्ये पात्र आधुनिक वैद्याची नियुक्ती करण्याऐवजी वैयक्तिक मैत्रीच्या आधारे अन्य आधुनिक वैद्याची नियुक्ती केली. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या; परंतु अनुभव नसलेल्या आधुनिक वैद्यांची प्रमाणपत्राविना नोंदणी केली जात आहे, तसेच नोंदणीही कायदाबाह्य पद्धतीने करण्यात येत आहे.
या संदर्भात गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डिन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी ‘हे डॉ. वळवईकर यांचे वैयक्तिक मत आहे’, असे सांगून कुणाचाही हस्तक्षेप नाकारला.
संपादकीय भूमिकावैद्यकीय परिषदेच्या कारभारावर असे गंभीर आरोप अपेक्षित नाहीत ! |