समुद्रकिनार्यांवरील अवैध कृत्यांना आळा घालण्याची मंत्री रोहन खंवटे यांची सूचना
पणजी, ११ मे (वार्ता.) – गोव्यातील समुद्रकिनार्यांवर पर्यटकांना उपद्रव होणार्या अवैध कृत्यांना आळा घालण्याविषयी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी ११ मे या दिवशी पोलीस महासंचालक, पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी यांची बैठक घेऊन कडक निर्देश दिले आहेत.
Goa: Tourism minister vows crackdown on illegal activities on beaches https://t.co/1WJNcEa46W
— TOI Cities (@TOICitiesNews) May 11, 2022
ते म्हणाले,
‘‘गोव्याचे समुद्रकिनारे सुरक्षित आणि स्वच्छ असल्याची प्रतिमा जगभर निर्माण झाली पाहिजे. पर्यटन व्यवसायाशी संबंधित शॅकमालक, टॅक्सीचालक, हॉटेलचे मालक आदी घटकांनी शासनाला याकामी सहकार्य करावे. काही किनार्यांवर शॅकमालक अगदी समुद्राच्या पाण्याजवळ खाटा (डेक बेड) टाकतात. त्यामुळे पर्यटकांना किनार्यावर फिरता येत नाही. अशा गोष्टींत योग्य ते पाऊल उचलले जाईल. समुद्रकिनार्यांवर परप्रांतीय फिरते विक्रेते आणि भिकारी पर्यटकांच्या मागे लागतात. त्यामुळे सहलीसाठी येणार्या या पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. पर्यटकांना असे वाईट अनुभव येऊन त्यांनी चुकीचा संदेश पसरवू नये, यासाठी काही गोष्टी रोखणे आवश्यक आहे. पर्यटन खाते पर्यटन व्यवसायाशी निगडित शॅकमालक, ‘वॉटर स्पोर्ट्स’ करणारे आदी सर्वांनाच विश्वासात घेऊन पुढे जाणार आहे. हे व्यावसायिक पर्यटन वृद्धीसाठी ‘ब्रॅण्ड अॅम्बेसिडर’ (उत्पादनाच्या जाहिरातीसाठी निवडलेला) ठरावेत, असे आम्हाला वाटते.’’
या बैठकीला पोलीस महासंचालक जसपाल सिंह, पर्यटन संचालक मिनीन डिसोझा आणि गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडचे अधिकारी उपस्थित होते.