१७ जणांना अटक, तर नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी पसार !
मुंबई-वडोदरा कॉरिडॉरसाठीच्या शेतकरी भूसंपादनात कोट्यवधींच्या फसवणुकीचे प्रकरण
ठाणे, ११ मे (वार्ता.) – मुंबई-वडोदरा कॉरिडॉर मार्गासाठी भूसंपादन झालेल्या भिवंडी तालुक्यातील नंदीठणे येथील शेतकऱ्यांच्या भूमीचा ११ कोटी ६६ लाख ६४ सहस्र रुपयांचा शासकीय मोबदला बनावट शेतकरी उभे करून लाटण्यात आला. या प्रकरणी आतापर्यंत १७ जणांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना १० मे या दिवशी न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार म्हणून उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार विठ्ठल गोसावी यांचे नाव समोर आले असून ते सध्या पसार आहेत. त्यांना अटक झाल्यानंतरच या प्रकरणातील सूत्रधार समोर येतील, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
गोसावी यांच्या नावामुळे प्रांत कार्यालयातील आणखीही अधिकारी आणि कर्मचारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. यापूर्वी या गुन्ह्यात १५ आरोपींना अटक करण्यात आली होती. अन्वेषणानंतर साखराबाई उपाख्य अनिता बाळासाहेब वाघमारे आणि संतोष दत्तात्रय मोरे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाफसवणूक करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हायला हवे ! |