आपत्काळात देवतेला प्रसन्न कसे करावे ? (भाग ३)
१. अन्नपूर्णादेवीसाठी नैवेद्य करायचा असल्याने अन्नपूर्णाकक्षात तिच्या मूर्तीची स्थापना आणि पूजा करावी !
‘अन्नपूर्णाकक्षात देवत्व निर्माण करण्यासाठी किंवा ‘ते स्वतःचे स्वयंपाकघर नाही’, याची जाणीव रहाण्यासाठी अन्नपूर्णादेवीची एक लहानशी पितळ्याची किंवा चांदीची मूर्ती एखाद्या शुक्रवारी आणून तेथे ठेवावी. (अन्नपूर्णादेवीची मूर्ती पूर्व-पश्चिम दिशेला ठेवावी.) यामुळे ‘येथे केवळ स्वयंपाक करून खायचे नाही, तर अन्नपूर्णादेवीसाठी नैवेद्य करायचा असून तो ग्रहण करण्याचे हे स्थान आहे’, याची जाणीव प्रत्येक क्षणी होईल. स्वयंपाक करतांना भावही टिकून राहील. प्रतिदिन अंघोळीनंतर मूर्ती किंवा प्रतिमा यांची पंचोपचार पूजा करावी. ते शक्य नसल्यास किमान उदबत्ती, धूप आणि दिवा लावावा. जर फुले उपलब्ध असतील, तर तीही अन्नपूर्णादेवीच्या चरणी वहावीत. यानंतरच चूल पेटवावी किंवा त्यावर एखादे भांडे ठेवावे.
१ अ. पूजेच्या वेळी अन्नपूर्णादेवीला करावयाची प्रार्थना ! : ‘हे देवी, मी तुझ्या सेवेसाठी आले आहे. माझ्याकडून दिवसभर भावपूर्ण सेवा करवून घे. ‘हे तुझेच मंदिर आहे’, या भावाने मी येथील साहित्य ठेवू शकेन आणि तुझ्यासाठी नैवेद्य करू शकेन, असेच प्रयत्न माझ्याकडून होऊ देत.’
२. कांदा-लसणाचे पदार्थ किंवा मांसाहारी भोजन देवीला नैवेद्य म्हणून दाखवू नये !
जर तुम्ही कांदा-लसूण खात असाल किंवा मांसाहारी असाल, तर ते भोजन देवीला नैवेद्य म्हणून दाखवू नका. मांसाहारी पदार्थ अन्नपूर्णादेवीची मूर्ती असलेल्या देवघरात किंवा अन्नपूर्णाकक्षात ठेवू नये. कांदा-लसूण न घातलेले पदार्थच नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. कधी एखादा विशेष पदार्थ बनवला, तर तो अवश्य अन्नपूर्णादेवीला अर्पण करावा. नित्य बनवलेले पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून दाखवणे शक्य नसेल, तर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकतो.
३. सुवेर-सुतक आणि मासिक पाळी काळातील आचार
अन्नपूर्णाकक्षात देवीचे तत्त्व जागृत व्हावे, यादृष्टीनेच प्रयत्न करावेत. रजस्वला स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात बनवलेला किंवा स्पर्श केलेला कोणताही खाद्यपदार्थ देवीला अर्पण करूनये. सुवेर-सुतकाच्या वेळीसुद्धा नैवेद्य अर्पण करू नये.
४. भोजन बनवतांना चित्रपटातील गाणी ऐकणे, तसेच रजोगुणी किंवा तमोगुणी कार्यक्रम पहाणे टाळावे !
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (२९.१.२०२२)