नागपूर महानगरपालिकेतील २२ वर्षांपूर्वीच्या क्रीडा घोटाळ्यातील १०१ आरोपींची निर्दोष मुक्तता !
विलंबाने मिळणारा न्याय हा अन्यायच आहे !
नागपूर – येथील महापालिकेत २२ वर्षांपूर्वी गाजलेल्या क्रीडा घोटाळाप्रकरणी सर्व १०१ आरोपींची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एन्.जी. देशपांडे यांनी १० मे या दिवशी निर्दोष मुक्तता केली आहे. यात नागपूर पूर्वचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांच्यासह ९९ आजी-माजी नगरसेवक, ६ साहित्य दुकानदार आणि ४ महापालिकेचे अधिकारी यांचा समावेश आहे. या प्रकरणांत एकूण १०८ जणांवर आरोप होता. त्यांपैकी ७ जण मरण पावले आहेत.
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असतांना वर्ष २००० मध्ये भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेत क्रीडा साहित्य घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नगरविकास खात्याचे तत्कालीन सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. नगरसेवकांनी क्रीडा मंडळांना साहित्य देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा ठपका नंदलाल यांनी अहवालात ठेवला होता. (समितीने ठपका ठेवल्यानंतरही या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दाेष मुक्तता कशी होते ? कि समितीचा ठपका चुकीचा होता ? – संपादक) या प्रकरणी प्रथम सदर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. त्यात भाजपसह काँग्रेस, रिपाई आणि काही अपक्ष नगरसेवक यांचाही समावेश होता. क्रीडा साहित्य घोटाळ्याची चौकशी गुन्हे शाखेकडे हस्तांतरित केली होती. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात कलम ४२०, ४०४ आणि ४६८ अन्वये गुन्हे नोंद होते.