‘कूलिंग चार्जेस’च्या नावाखाली लूट !
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे रसवंतीगृह, शीतपेयांची दुकाने यांमध्ये ग्राहकांची चांगलीच गर्दी पहायला मिळत आहे. याचा अपलाभ उठवत अनेक शीतपेय विक्रेते ‘कूलिंग चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांची लूट करत आहेत.
सध्या बाजारात पेप्सीकोला, ताक, लस्सी, तसेच विविध प्रकारची शीतपेये उपलब्ध आहेत. कोरोना काळानंतर उन्हाळ्यात लग्नसराई, पर्यटन यांमुळेही शीतपेयांना चांगली मागणी आहे. ग्राहकांची नेमकी अडचण पाहून अनेक छोटे मोठे शीतपेय विक्रेते मूळ किंमतीहून ३ ते ५ रुपये अधिक रक्कम आकारत आहेत. याविषयी जाब विचारल्यास ग्राहकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, तसेच ‘फ्रिज बाहेर ठेवलेली शीतपेयाची बाटली तुम्हाला मूळ किंमतीमध्ये मिळेल; मात्र थंड बाटली हवी असेल, तर कूलिंग चार्जेस द्यावे लागतील’, असे काही ठिकाणी दुकानदार सांगतात. दुकानदारांच्या या कृतीला कोणताही कायदेशीर आधार नाही. त्यामुळे दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात असल्याचे चित्र सातारा जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी तर ‘कूलिंग चार्जेस’ १० ते १५ रुपयांपर्यंत आकारले जात आहेत. ग्राहकही या किरकोळ गोष्टींसाठी ‘कुठे तक्रार करा, स्वत:चा वेळ वाया घालवा’, असा विचार करून दुर्लक्ष करत आहेत. याविषयी दुकानदारांकडे चौकशी केली असता ते म्हणतात, ‘शीतपेयांना थंड करण्यासाठी लागणारी साधने, वीजदेयके आदींचा विचार करता शीतपेये मूळ किंमतीला विकणे आम्हाला परवडत नाही. त्यामुळे शीतपेये थंड ठेवण्यासाठी येणारा व्यय आम्ही ग्राहकांकडून घेतो, तसेच ती विक्री करून मिळणारा लाभ (मार्जिन) हाही अत्यल्प आहे.’
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार वस्तू विकत घेतांना मूळ किंमतीहून अधिक किंमत आकारली जात असेल, तर तो गुन्हा ठरतो. ग्राहकांना अंधारात ठेवून शीतपेयाच्या मूळ किंमतीहून अधिक रक्कम आकारून दुकानदार एक प्रकारे लूटच करत आहे. शीतपेये उत्पादकांनीही दुकानदारांना योग्य लाभ मिळण्यासाठी धोरण ठरवले पाहिजे. सरकारनेही ग्राहकांची होणारी ‘आर्थिक लूट’ थांबवण्यासाठी कायद्याची प्रभावी कार्यवाही केली पाहिजे.
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा