पाकिस्तानच्या सांगण्यावरून मी काश्मीरमधील तरुणांना आतंकवादासाठी चिथावणी देत होतो !

  • माजी जिहादी आतंकवादी यासीन मलिक याची न्यायालयात स्वीकृती

  • १९ मे या दिवशी शिक्षा सुनावणार  

 

माजी जिहादी आतंकवादी यासीन मलिक

नवी देहली – पाकिस्तानच्या सांगण्यावरूनच मी काश्मीरमध्ये तरुणांना चिथावणी देत होतो. यासाठी आणि अन्य देशविरोधी कारवायांसाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी मी यंत्रणा बनवलर होती, अशी स्वीकृती पूर्वीचा जिहादी आतंकवादी यासीन मलिक याने देहलीतील एन्.आय.ए. न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी दिली. त्याला १९ मे या दिवशी होणार्‍या सुनावणीत शिक्षा सुनावण्यात येणार आहे. यासीन मलिक सध्या कारागृहात आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १६ (आतंकवाद कायदा), कलम १७ (आतंकवादासाठी निधी जमवणे), कलम १८ (आतंकवादाचा कट रचणे) आणि कलम २० (आतंकवादी टोळीचा सदस्य) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले होते. यासह त्याच्यावर त्याच्यावर यु.ए.पी.ए., १२०ब (गुन्हेगारी कट) आणि देशद्रोह कलमांर्तगतही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

यासीन मलिक याच्यावर काश्मीरमधील तरुणांना चिथावणी देण्यापासून वायूदलाच्या अधिकार्‍यांची हत्या करणे, ‘लष्कर-ए-तोयबा’चा म्होरक्या हाफीज सईद याला भेटणे, तत्कालीन गृहमंत्री महमद सईद यांच्या मुलीचे अपहरण करणे, असे अनेक गंभीर आरोप आहेत. वर्ष २०१३ मध्ये यासीन मलिक हा हाफीज सईद याच्यासमवेत पाकमध्ये आमरण उपोषणाला बसला होता. महंमद अफजल याला फाशी दिल्यानंतरही यासीन मलिक याने निदर्शने केली होती.

संपादकीय भूमिका

पाकविरुद्ध सातत्याने ढीगभर पुरावे मिळाल्यानंतर तरी सरकारने पाकला धडा शिकवण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत !