रत्नागिरीत आंबा व्यावसायिकांची जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे मागणी
रात्री चालणार्या आंबा खरेदी केंद्रावर बंदी घालून हापूसची चोरी रोखा !
रत्नागिरी – प्रतिदिन होणार्या आंबा चोरीमुळे येथील आंबा व्यावसायिक हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळी चालू असलेल्या खरेदी विक्री केंद्रामधून चोरीचे आंबे विकले जात आहेत. ‘रात्री चालणार्या आंबा खरेदी केंद्रावर बंदी घालून हापूसची चोरी रोखावी’, अशा मागणीचे निवेदन येथील कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी डॉ. बी.एन्. पाटील यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,
हापूस आंब्याचा मोसम चालू झाला आहे. ज्या बागायतदारांच्या छोट्या-मोठ्या बागा आहेत, त्यांच्या बागांमधून संध्याकाळ ते मध्यरात्र या वेळेत आंबा चोरीचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. रात्रीची आंबा खरेदी केंद्र जागोजागी १२ ते १ वाजेपर्यंत उघडी असतात. या केंद्राच्या माध्यमातून चोरीचा आंबा विकला जात आहे. याविषयी तलाठी, सर्कल आणि पोलीस यांच्याकडून माहिती करून घेतली तर या चोरीची पूर्ण कल्पना येईल. काही बागायतदारांचे रातोरात १० ते ३० ‘क्रेट’ आंबा चोरी झालेले आहेत. अनेक आंबा बागायतदारांची ही हानी झाली आहे. बहुतांशी हापूस आंबा खरेदी विक्री केंद्रे ही अनधिकृत आहेत. या केंद्रांनी कृषी खात्यांकडून किंवा अन्य संबंधित खात्यांकडून परवानाही घेतलेला नसतो. तरी याविषयी त्वरित दखल घेऊन सायंकाळी ७ वाजेपर्यंत केंद्रे बंद करणासंबंधी सूचना द्याव्यात, अशी विनंती आहे.