सकारात्मक आणि तत्त्वनिष्ठ असलेला देहली सेवाकेंद्रातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा श्री. देवदत्त योगेश व्हनमारे (वय १७ वर्षे) !

‘वैशाख शुक्ल दशमी (११.५.२०२२) या दिवशी देहली सेवाकेंद्रातील श्री. देवदत्त योगेश व्हनमारे याचा १७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. देवदत्त योगेश व्हनमारे याला १७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

श्री. देवदत्त व्हनमारे

१. स्थिर

श्रीमती अलका व्हनमारे

गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच मला देवदत्त लाभला आहे. त्याच्या बाबांचे (कै. योगेश व्हनमारे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे) निधन झाल्यानंतर ‘मी देवदत्तला सांभाळू शकेन का ?’, या विचाराने मी अस्वस्थ होत असे; पण केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच देवदत्त स्थिर आणि सकारात्मक झाला असून तो मला साहाय्यही करतो.

२. सकारात्मक आणि तत्त्वनिष्ठ

देवदत्त पुष्कळ सकारात्मक असतो. त्याच्याशी बोलतांना माझ्या मनात कोणताही नकारात्मक विचार टिकत नाही. तो मला नकारात्मक स्थितीतून अलगदपणे बाहेर काढतो. एखाद्या प्रसंगात त्याच्याशी साधनेविषयी चर्चा करतांना माझी मनःस्थिती ठीक नसल्यास तो तत्त्वनिष्ठतेने; परंतु प्रेमाने आणि सकारात्मकतेने मला श्री गुरुचरणांकडे नेतो.

३. देवदत्तशी भ्रमणभाषवर बोलणे म्हणजे सत्संगच असणे

आता आमच्या जीवनात व्यावहारिक बोलण्यासारखे विशेष काही नसते. तो माझ्याशी भ्रमणभाषवर बोलत असतांना मला ‘सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांचा सत्संग मिळत आहे’, असे जाणवते. सद्गुरु पिंगळेकाका देवदत्तला जे मार्गदर्शन करतात, त्यातील माझ्यासाठीची आवश्यक सूत्रे तो मला भ्रमणभाष करून सांगतो. ती सूत्रे ऐकतांना ‘श्री गुरूंनीच माझ्यासाठी हा संदेश पाठवला आहे’, असे मला वाटते.

४. देवदत्तचे सद्गुरु पिंगळेकाकांवर प्रचंड प्रेम आणि अतिशय श्रद्धा आहे. त्याच्या बोलण्यात प्रत्येक २ – ३ वाक्यानंतर सद्गुरु काकांचे नाव असते.

५. मुलाविषयी निश्चिंतता वाटणे

आधी मला देवदत्तची पुष्कळ काळजी वाटायची; पण आता ‘श्री गुरूंची त्याच्यावर असलेली कृपा, त्याला सद्गुरु पिंगळेकाकांचा मिळत असलेला सत्संग आणि ते घेत असलेली त्याची काळजी, तसेच देहली सेवाकेंद्रातील साधकांचे त्याला मिळत असलेले प्रेम’ यांमुळे ‘ही कळी निश्चितच एक सुंदर कमलपुष्प बनून श्री गुरुचरणी एकरूप होणार’, असे मला आता वाटते. माझ्या मनात बऱ्याच अंशी एक निश्चिंतता निर्माण होत आहे.

‘ही सर्व केवळ त्या प्राणप्रिय गुरुमाऊलींची कृपा आहे’, असे मला वाटते. श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !

– श्रीमती अलका योगेश व्हनमारे (आई), सोलापूर सेवाकेंद्र (१८.४.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक