हिंदु जनजागृती समितीने रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथे रोवलेल्या धर्माच्या बीजाचा वटवृक्ष होईल ! – रघुनाथ पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी २५० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती !
रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर), १० मे (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी केलेले बलीदान आपण कायमच स्मरणात ठेवले पाहिजे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रत्येक वर्षी बलीदान मासाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण कायम तेवत ठेवतो. सर्व हिंदूंनी जात, पात, संप्रदाय बाजूला ठेवून एकत्र यायला हवे. हिंदु जनजागृती समितीने रेंदाळ येथे धर्माचे जे बीज रोवले आहे, त्याचा भविष्यात वटवृक्ष होईल, असे गौरवोद्गार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. रघुनाथ पाटील यांनी काढले. रेंदाळ येथे ९ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत वर्ष १९९२ मध्ये अयोध्येत ‘कारसेवा’ केल्याविषयी त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या सभेत हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी, तसेच कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी मार्गदर्शन केले. या सभेसाठी २५० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती होती. सभेत धर्मप्रेमी श्री. रामभाऊ मेथे यांनी सूत्रसंचालन केले. या सभेत श्री. किरण दुसे यांचा सत्कार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सचिन पाटील यांनी, तर सौ. राजश्री तिवारी यांचा सत्कार श्री. तानाजी शिंदे यांनी केला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला वंदन करण्यात आले.
विशेष
१. या सभेचे आयोजन आणि नियोजन करण्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रेंदाळ येथील धारकरी, तसेच परिसरातील शिवभक्त यांचा पुढाकार होता.
२. सभेनंतर जिज्ञासूंनी धर्मशिक्षणवर्ग, तसेच स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग यांची मागणी केली.