संभाजीनगर येथे देवमुद्राच्या शिष्यांकडून नृत्यसाधना कार्यक्रम !
संभाजीनगर – प्रत्येक शास्त्रीय नृत्यातून पौराणिक कथा दाखवल्या जातात. त्या कथा आजच्या आधुनिक युगातही समर्पक संदेश देणाऱ्या ठरतात. नृत्य म्हणजे केवळ डोळ्याचे पारणे फेडणे नव्हे, तर ध्यानातील एक अवस्था आहे. याची प्रचिती देवमुद्रा नृत्य अकादमीच्या नृत्यसाधना उत्सवात आली. जागतिक नृत्यदिनानिमित्त ‘देवमुद्रा अ मूव्हमेंट स्कूल’ संस्थेच्या वतीने नृत्यसाधना कार्यक्रम ९ मे या दिवशी घेण्यात आला. या वेळी आहारतज्ञ आधुनिक वैद्या अस्मी भट, फिजिओथेरपिस्ट आधुनिक वैद्या मृणाल कुलकर्णी, देवमुद्राचे विश्वस्त सदस्य आ. अवतारसिंह सोदी, आधुनिक वैद्य जयंत शेवतेकर यांची उपस्थिती होती. ‘नृत्यकला व्यक्तीचे शरीर, मन आणि बुद्धी यांची मशागत करते. त्यामुळे नृत्यकला साधना म्हणून जोपासली पाहिजे’, असा उपदेश आधुनिक वैद्य शेवतेकर यांनी दिला.
भरतनाट्यम नृत्य प्रकारातील पुष्पांजली आणि गणेश वंदना यांनी कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर कुचिपुडीत गणपति कौत्वम सादर झाले. देवीस्तुती आणि शिवस्तुती यांनी मने जिंकली. शहरातील नामवंत कथक आणि ओडिसी नृत्य कलाकार अजय शेंडगे यांनी ओडिसी नृत्य प्रकारातील मंगलाचरण अन् पल्लवी सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. ३ शास्त्रीय नृत्यकलांचा हा संगम रसिकांसाठी विलक्षण ठरला. आश्लेषा मगरे आणि ज्ञानदा साबदे यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. सौम्याश्री यांनी आभार मानले.