नाशिक येथील मनसे शहराध्यक्ष पुन्हा तडीपार; जिल्हाध्यक्षांना अटक !
नाशिक – हनुमान चालिसा प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यावर पसार होऊन अटकेनंतर जामीन मिळालेले मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना साहाय्यक पोलीस आयुक्तांनी १० दिवसांसाठी तडीपार केले आहे. त्याविषयीची नोटीस त्यांना देण्यात आली आहे, तर मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांना भद्रकाली पोलिसांनी त्र्यंबकेश्वर येथे ९ मे या दिवशी अटक केली आहे. पवार यांच्यासमवेत असलेले मनसेचे पदाधिकारी विजय ठाकरे आणि किरण क्षीरसागर यांना पोलिसांनी भोंगा आंदोलन प्रकरणी कह्यात घेतले आहे.
हनुमान चालिसा प्रकरणावरून राज्यभर मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे. सातपूर पोलीस ठाण्यातील नोंद गुन्ह्यात दातीर पसार होते; मात्र पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन संमत केला. पोलिसांच्या या कारवाईवर दिलीप दातीर यांनी अप्रसन्नता व्यक्त केली असून ‘जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तडीपारीची कारवाई का ?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ‘पोलिसांच्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे’, असे त्यांनी सांगितले आहे.