अन्नपूर्णाकक्षातील सात्त्विकता कशी टिकवावी ?
आपत्काळात देवतांना प्रसन्न कसे करावे ?
‘आपण सर्वप्रथम अन्नपूर्णाकक्षात देवत्व कसे निर्माण करायचे, ते पाहूया. आपण आपल्या देवघराविषयी जसा भाव ठेवतो किंवा जे धर्माचरण आपण आपल्या देवघराच्या संदर्भात करतो, ते अन्नपूर्णाकक्षातही करावे !
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/578379.html |
१. पादत्राणे घालून अन्नपूर्णाकक्षात गेल्यास देवत्व न्यून किंवा नष्ट होणे
शहरात सध्या बाहेरून येऊन पादत्राणे (चप्पल किंवा बूट) घालून सरळ अन्नपूर्णाकक्षात प्रवेश केला जातो. या रज-तमयुक्त आचरणामुळे अन्नपूर्णाकक्षातील देवत्व न्यून होते किंवा नष्टच होते. काही लोक घरात पादत्राणे घालून कक्षात जातात. ते म्हणतात, ‘‘आम्ही या चपला केवळ घरातच वापरतो. त्यामुळे ते चालू शकते’’; परंतु असे करू नये. अन्नपूर्णाकक्षात जर आवश्यकता असेल, तरच केवळ पायमोजे किंवा सध्या पेठेत (बाजारपेठेत) मिळणारी कापडी पादत्राणे (बुटीज) घालावीत ! आपला भाव जेवढा श्रेष्ठ असतो, तेवढ्या लवकर आणि अधिक प्रमाणात देवत्व कार्यरत होते.
२. रजस्वला स्त्रियांनी अन्नपूर्णाकक्षात का जाऊ नये ?
रजस्वला (मासिक पाळी चालू असतांना) स्त्रियांनीसुद्धा अन्नपूर्णाकक्षात अन्न बनवण्यासाठी जाऊ नये. ही रूढी नसून शास्त्र आहे. मीसुद्धा एक स्त्री आहे. मी सूक्ष्म इंद्रियांच्या साहाय्याने शोधून अनुभूती घेतली आहे की, मासिक पाळीच्या वेळी आजच्या स्त्रियांना वाईट शक्तींचा अधिक प्रमाणात त्रास होतो. मासिक पाळीमुळे रज आणि तम, हे दोन्ही गुण त्या काळात स्त्रियांमध्ये थोडे अधिक असतात. त्यात वाईट शक्तींचा त्रासही वाढतो. अशा स्त्रियांनी बनवलेले भोजन देवाला नैवेद्य म्हणून दाखवता येत नाही आणि ते आपणही खाऊ शकत नाही. त्यामुळे अशा काळात स्त्रियांनी अन्नपूर्णाकक्षात जाऊ नये.
३. स्त्री रजस्वला असल्यास त्या कालावधीत स्वयंपाक कुणी करावा ?
काही लोक म्हणतील, ‘सध्या विभक्त कुटुंंबपद्धत अस्तित्वात आहे. त्यामुळे अशा वेळी पुष्कळ अडचण येते.’ देवतेसाठी आपण कष्ट घेतल्यावर देवताही प्रसन्न होतात, हे लक्षात घ्यावे. त्यामुळेच जर देवाची कृपा अपेक्षित असेल, तर धर्मपालन करायलाच पाहिजे. स्त्री रजस्वला असल्यास घरातील मुलींनी जेवण करावे. मुलगी नसल्यास पुरुष किंवा मुलगा यांनी जेवण सिद्ध करावे. यामुळे सर्वजण स्वतः स्वयंपाक बनवायला शिकतील आणि त्यांच्यामध्ये विकसित होणारा गुण त्यांना आयुष्यभरासाठी सदैव उपयुक्तच ठरेल.’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (२९.१.२०२२)
|