अन्न परब्रह्म !
भारत हा एक असा देश आहे की, जेथे अनेक शहरांमध्ये अन्न अधिक झाले; म्हणून फेकून दिले जाते, तर दुसरीकडे लक्षावधी लोक अर्धपोटी किंवा उपाशीपोटी झोपतात. यावरील उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांना अन्न वाया जाऊ नये, यासाठी धडा शिकवण्याचे निश्चित केले आहे. या धड्यात ताटात शेष राहिलेल्या अन्नाचे महत्त्व मुलांना समजून सांगितले जाईल, तसेच केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिशानिर्देशही जारी केले आहेत. विद्यार्थी हेच पुढे जाऊन राष्ट्राचे नागरिक बनत असल्याने अन्न वाया जाऊ न देण्यासाठीचा केंद्र सरकारचा हा उपक्रम स्तुत्यच म्हणावा लागेल. यामध्ये विद्यार्थ्यांना ‘अन्नाचे महत्त्व काय आहे ? त्याचा लाभ किती होईल ? तसेच जेवढी भूक असेल, तेवढेच वाढून घ्यावे’, हे शिकवले जाणार आहे.
भारतात वर्षभरात लाखो विवाह होतात. प्रत्येक विवाहात सरासरी ५० लोकांचे तरी अन्न वाया जाते. बाकी ‘पार्टी’ (मेजवान्या), उपाहारगृह यांसह जवळपास प्रत्येक ठिकाणी प्रतिदिन अन्नाची नासाडी होते, ती वेगळीच. ‘द युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम’च्या वर्ष २०२१ मध्ये जारी केलेल्या अहवालानुसार भारतात प्रत्येक व्यक्ती वार्षिक ५० किलो अन्न वाया घालवते. ही नासाडी शेतातून धान्य निघाल्यापासून ताटात पडण्यापर्यंतची आहे. अनेक लोक ताटात उष्टे अन्न ठेवतात, असेही अहवालात म्हटले आहे.
वास्तविक हिंदु संस्कृतीत देवाला नैवेद्य दाखवून तो नैवेद्यच प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. पूर्वी भोजन करण्यापूर्वी देवाला अन्नाचा नैवेद्य दाखवल्याविना ते ग्रहण केले जात नव्हते. अन्नाकडे प्रसाद म्हणून पाहिल्याने साहजिकच ते टाकून देण्याची भावनाही होत नसे; मात्र २१ व्या शतकात हे सर्व लोप पावले असून अन्नाची नासाडी ही सामान्य झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर बालवयापासून अन्नाची नासाडी न करण्याचे संस्कार झाले, तर भविष्यात तेच त्यांच्या अंगवळणी पडल्याने अन्न वाचवण्यास साहाय्यभूत होईल. त्यामुळे असे धडे शिकवण्यासमवेत विद्यार्थ्यांना अन्नाकडे प्रसाद म्हणून पहाण्याची भावनाही निर्माण होण्यासाठी प्रार्थना, नामजप हेही जोडीला शिकवणे अत्यावश्यक आहे. असे झाल्यास मूळ समस्येवर योग्य उपाययोजना निघेल आणि लक्षावधी टन अन्नाची नासाडीही वाचेल, हे नक्की !
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर