शिवसेनेच्या नेत्यांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाला खडसावले !
खासदार नवनीत राणा यांची ‘एम्.आर्.आय.’ कक्षात छायाचित्रे काढल्याचे प्रकरण
मुंबई – वैद्यकीय नियमांनुसार ‘एम्.आर्.आय.’ काढण्याच्या कक्षात भ्रमणभाष नेता येत नाही. असे असतांना खासदार नवनीत राणा लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी गेल्या असतांना तेथील ‘एम्.आर्.आय.’ कक्षात त्यांची छायाचित्रे काढण्यात आली. ती सामाजिक माध्यमांवरून प्रसारित करण्यात आली आहेत. या प्रकरणी मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर, शिवसेनेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांसह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी यांनी ९ मे या दिवशी लीलावती रुग्णालयात जाऊन याची विचारणा केली.
सौ. किशोरी पेडणेकर यांनी ‘एम्.आर्.आय. स्कॅनिंग’ चालू असतांना तेथे भ्रमणभाष नेण्यास अनुमती कशी दिली ? ‘रेडिएशन’मुळे स्फोट झाला, तर त्याला उत्तरदायी कोण ? अशा प्रकारे छायाचित्रे काढण्यात येत असतांना रुग्णालयातील कुणीही संबंधितांना रोखले का नाही ? अशी विचारणा केली. या वेळी डॉ. मनीषा कायंदे यांनी ‘पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कोणतीही महनीय व्यक्ती यांच्यासाठी रुग्णालयाचे नियम सारखे असतात. लीलावती रुग्णालय खासगी असले, तरी नियमांचे पालन केले पाहिजे. असे प्रकार रुग्णालयात खपवून घेतले जाणार नाहीत’, अशा शब्दांत रुग्णालयांतील अधिकाऱ्यांना सुनावले.
रुग्णालय प्रशासनाने झालेली चूक मान्य केली, तसेच नवनीत राणा यांची छायाचित्रे काढण्यात आली, त्या वेळी ‘एम्.आर्.आय.’ यंत्र बंद असल्याचे स्पष्टीकरण दिले. खासदार नवनीत राणा रुग्णालयात उपचारासाठी असतांना त्यांचे अनेक व्हिडिओ प्रसारित झाले आहेत. नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी, तसेच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या भेटीच्या वेळी वृत्तवाहिन्यांनी रुग्णालयाचे थेट प्रक्षेपण केले होते.
जामीन रहित करून अजामीनपात्र वॉरंट का काढू नये ?
न्यायालयाची राणा दांपत्याला विचारणा !
मुंबई – जामीन रहित करून तुमच्या विरोधात अजामीनपात्र अटक ‘वॉरंट’ का काढू नये, अशी विचारणा मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना केली आहे. याविषयी न्यायालयाने राणा दांपत्याला नोटीस पाठवली आहे.
राणा दांपत्याकडून जामिनासाठी दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा अर्ज मुंबई पोलिसांनी न्यायालयाकडे केला. यामध्ये पोलिसांनी राणा यांचा जामीन रहित करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. यावर न्यायालयाने राणा दांपत्याला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.